...अन् विजयदुर्गबाबतच्या आशा पल्लवित

संतोष कुळकर्णी
Tuesday, 21 July 2020

दरवर्षी सुमारे दोन लाख पर्यटकांची विजयदुर्ग किल्ल्याला भेट असते. मात्र येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी अधिक साधने गरजेची आहेत.

देवगड (सिंधुदुर्ग) - मराठ्यांचे आरमारी केंद्र म्हणून ओळख असलेला ज्याच्या तटबंदीवर तत्कालीन तोफगोळ्याचे व्रण आजही दृष्टिपथास पडत असलेला "घेरिया' अर्थात "विजयदुर्ग' किल्ल्याच्या समुद्राकडील तटबंदीचा भाग ढासळत आहे. याचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी तातडीने डागडुजीची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधून किल्ल्याच्या डागडुजीसाठी आवश्‍यक प्रशासकीय हालचाली करण्याची सूचना केल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. 

इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याचे जतन होणे तालुक्‍याच्या दृष्टीने आवश्‍यक बाब मानली जात आहे. अष्टशताब्दी महोत्सवामुळे किल्ल्याच्या शौर्याची गाथा जगासमोर आल्याने किल्ल्यावरील पर्यटकांची वर्दळ वाढली. किल्ल्याच्या डागडुजीमुळे पर्यटन व्यवसायालाही आपोआप बळकटी येईल. सुमारे 127 वर्षे विजारपुरांकडे असलेला हा किल्ला 1653 मध्ये छत्रपती शिवरायांनी जिंकला. यानंतर 165 वर्षे मराठ्यांचा अंमलाखाली होता. या काळात किल्ल्यात अनेक सुधारणा झाल्या.

किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे, आंनदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमारप्रमुख होऊन गेले. इंग्रज, पोर्तुगीज, डच या परकियांनी "जिब्राल्टर' म्हणून उल्लेखलेला किल्ला शौर्याच्या आठवणी जागवतो आहे. 1195 ते 1205 या कालावधीत शिलाहार घराण्यातील राजा भोज याने किल्ला बांधला. 1218 मध्ये किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात गेला. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव करून कोकण प्रांत बळकावला.

1431 विजयनगरच्या राजाचा पराभव करून बहमनी सुलतान अल्लाउद्दीन अहमदशाह याच्या ताब्यात गेला. 1490 ते 1526 बहमनी राज्याचे पाच तुकडे झाले त्यात किल्ला विजापुरच्या आदीलशाहीकडे सोपवला गेला. 1526 ते 1653 या सुमारे 127 वर्षाच्या काळात किल्ला विजापुरांच्या अंमलाखाली होता. किल्ल्याला शौयाचा इतिहास आहेच. त्याचप्रमाणे हेलियम वायुचा शोधही येथेच लागल्याने किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व असून त्याची जपणूक आवश्‍यक आहे. 

किल्ल्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली ही चांगली बाब आहे. मराठ्यांच्या आरमाराचे शक्तीकेंद्र असलेला किल्ला जतन व्हायला हवा. स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या किलल्याचे जैवविविधतेच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. यासाठी प्रेरणोत्सव समितीचे नेहमीच सहकार्य राहील.'' 
- राजीव परुळेकर, किल्ले विजयदुर्गसह किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे प्रणेते 

ऐतिहासिक बाज कायम ठेवून सुधारणा आवश्‍यक 
किल्ले विजयदुर्गची तटबंदी अभेद्य आहे. किल्ल्याला सुमारे आठशे वर्षे उलटली तरीही किल्ला सुस्थितीत आहे; मात्र गेल्या काही वर्षात समुद्राकडील भागाची तटबंदी ढासळू लागली. तटबंदीच्या तळातील दगड निसटू लागले आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरता येते; मात्र समुद्राकडील काही भाग धोकादायक बनला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची उंची सुमारे 36 मीटर असून किल्ल्याला आतील बाजूने आणखी तटबंदी असल्याने किल्ला अभेद्य मानला जातो. तरीही आता काळानुरूप समुद्राच्या लाटांचा मारा होणाऱ्या भागात किल्याची डागडुजी आवश्‍यक आहे.

यापूर्वी त्याची डागडुजी झाली होती. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी किल्ल्याकडे लक्ष देणे आवश्‍यक बनले आहे. किल्ल्यात गणेश, राम, हनुमान, दर्या, तुटका, सिखरा, शिंद, शाहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन, गोविंद, सदाशिव, खुबलढा तोफा बारा, धनजी बुरूज तोफा बारा, पाण, पडकोट खुष्की, नर असे एकूण वीस बुरूज आहेत. किल्ल्यात शंकराचे व भवानी मातेच्या मंदिराचे अवशेष आहेत. 1818 मध्ये खग्रास सूर्यग्रहणावेळी जॉनसन व लैकीयर शास्त्रज्ञांकडून किल्ल्यावर हेलियमचा शोध लावला गेला. त्याठिकाणी असलेल्या चबुतऱ्याला साहेबांचे ओटे तर ठिकाणाला "हेलियमचे पाळणाघर' म्हणून ओळखले जाते. 

इतिहास जपतानाच भविष्यातील दुर्गपर्यटनाचा विचार करून किल्ल्याचा ऐतिहासिक बाज कायम ठेवून आतमध्ये विद्युत व्यवस्था, प्रदर्शनीय हॉल असावा याबाबतचा नकाशा तयार करून भारतीय पुरातत्त्व विभागाच्या केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडे प्रकल्प सादर करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. दरवर्षी सुमारे दोन लाख पर्यटकांची विजयदुर्ग किल्ल्याला भेट असते. मात्र येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी अधिक साधने गरजेची आहेत.

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister's order to repair Vijaydurg fort konkan sindhudurg