esakal | Chipi airport: तब्बल 16 वर्षांनंतर उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर
sakal

बोलून बातमी शोधा

Chipi airport: तब्बल 16 वर्षांनंतर उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर

Chipi airport: तब्बल 16 वर्षांनंतर उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शिवसेनेत एकत्र असणारे हे दोन नेते सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांचं उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचं अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचं एका मंचावर येणं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वारंवार शिवसेनेला आपल्या अंगावर घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते अजिबात कचरत नाहीत. त्यांच्या याच स्वभावगुणामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर एकच गजहब माजला होता. याप्रकारच्या चुकीच्या वक्तव्याची ढाल करत मग शिवसेनेनेही नारायण राणे यांना कोंडीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ही सगळी घडामोड अद्याप ताजी असतानाच आता दुसरीकडे ते एका मंचावर येणार असल्याने सगळे या कार्यक्रमाबाबत उत्सुक आहेत. आज तब्बल 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचं बांधकाम पूर्ण होऊन त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमात ते एकत्र आल्यावर ते एकमेकांशी बोलणार का, बोलले तर काय बोलणार? मंचावरची त्यांची देहबोली कशी असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

कोकणातील महत्त्वकांक्षी प्रकल्प - चिपी विमानतळ

चिपी विमानतळाचं लोकार्पण म्हणजे कोकणी माणसाचं स्वप्न साकार होत आहे. हे विमानतळ शनिवारपासून सुरु होत होणार आहे. त्याची लँडींग चाचणी देखील पूर्ण झाली आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रोटोकॉलप्रमाणे राज्य, केंद्राचे मंत्री, प्रमुख अधिकारी यांच्यासाहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळी निमंत्रित असणार आहेत. या कार्यक्रमाला नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित असणार आहेत.

विमानतळाचाही श्रेयवाद

हे सिंधुदुर्ग विमानतळ कोणी सुरू केलं आणि या विमानतळाचं श्रेय कुणाचं? यावरून देखील सध्या सिंधुदुर्गात मोठं राजकारण सुरु आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विमानतळ मी बांधून पूर्ण केल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हे विमानतळ आपल्या कार्यकाळात पूर्ण झालं आहे आणि आता आपल्याच कार्यकाळात त्याचं लोकार्पण देखील होत असल्याचा दावा ते करत आहेत.

loading image
go to top