चिपीहून मुंबईसाठी रोज विमानसेवा ः पालकमंत्री

chipi airport issue statement Minister Uday Samant
chipi airport issue statement Minister Uday Samant

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले आहेत. येथील पर्यटन व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी पंचतारांकीत हॉटेल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून आणत आहे. अल्पावधित चिपी विमानतळ सुरू होईल. येथून रोज मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई विमान उडेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात केले. 

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. 

देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेला सिंधुदुर्ग कायम पर्यटनात अग्रेसर राहील, असा विश्‍वास व्यक्त करुन पालकमंत्री म्हणाले, ""आपला जिल्हा सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया. सिंधुदुर्ग हा देशातील आदर्श पर्यटन जिल्हा व्हावा, यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करुया. जिल्ह्याच्या पर्यटनाला अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठीच जिल्ह्यात चिपी विमानतळ सुरू होत आहे.

या विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हा विमानतळ कार्यान्वित होणार आहे. जिल्हावासीयांचे विमानतळाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. जिल्ह्यात पंचतारांकीत हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या पुढाकारातून ताज हॉटेल्ससारखे प्रकल्प आता जिल्ह्यात येणार आहेत. याविषयीचा करारही पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. 

मुख्य शासकीय ध्वजवंदन झाल्यानंतर पालकमंत्र्याच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी (2019-2020) मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयांना प्रशस्तीपत्रक तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सन्मानपत्र देऊन आणि महाकृषी पंप उर्जा अभियांनातर्गंत लाभार्थ्यांना पालकमंत्र्याच्या हस्ते मागणीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

पोलिस दलाने यावेळी मानवंदना दिली. त्यानंतर झालेल्या संचलनामध्ये पोलिस बॅंड पथक, श्‍वान पथक, जलद प्रतिसाद दल, वज्र वाहन, दंगल नियंत्रण पथक, रुग्णवाहिका, वेंगुर्ले नगरपरिषदेचे अग्नीशमन दल आदींनी सहभाग नोंदवला. ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी उपोषण करणाऱ्यांची आत्मियतेने चौकशी केली. त्यांचे तत्काळ प्रश्‍न सोडविण्याचे प्रशासनाला आदेश दिले. तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुंभागी साठे आदी उपस्थित होते. 

मुख्यालयात राष्ट्रध्वज उभारणार 
पालकमंत्री म्हणाले, 15 दिवसांत कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. या स्मारकाच्या जागेचा प्रलंबित असलेला प्रश्‍नही मार्गी लावला आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणाचाही विकास करण्याचे नियोजन आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी यंदाच्या वर्षी 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे.'' 

लसीकरणाची भीती नको 
सामंत म्हणाले, ""कोरोनाच्या कठीण काळातही जिल्हावासीयांनी नियमांचे पालन करून प्रशासनास साथ दिली. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यात यश आले. आता लसीकरणाचाही प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात डॉक्‍टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात पोलिस व महसूल प्रशासन, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांना लस देण्यात येणार आहे. भीती न बाळगता लस घ्यावी.'' 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com