esakal | चिपी विमानतळ उद्घाटनविषयी सुरेश प्रभूंचं मोठ वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

suresh prahu

चिपी विमानतळ उद्घाटनविषयी सुरेश प्रभूंचं मोठ वक्तव्य

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या 9 ऑक्टोबरला करण्यात येणार असल्याचे भाजप आणि शिवसेनेकडून जाहीर केले आहे; मात्र या विमानतळाचे उद्घाटन कधी होत आहे याची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केल्याने याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मालवण-मेढा येथे मूळ गावी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची आज भेट घेतली. यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, `चिपी विमानतळाचे भूमिपूजन मी केंद्रीयमंत्री व नारायण राणे उद्योगमंत्री असताना झाले होते. त्यानंतरच्या काळात या विमानतळाचे काम रखडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा आपल्याकडे नागरी उड्डाण मंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी पहिल्याच बैठकीत चिपी विमानतळाचा आढावा घेत यात ज्या परवानग्या आवश्यक होत्या त्या मिळवून दिल्या.

विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. हे विमानतळ राज्य सरकारचे असल्याने विमान टेकऑफ, लॅण्डींगसाठी ते योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच विमानाने दिल्लीला गेलो. त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन हे फीत कापून न होता उड्डाण करून झाले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून स्थानिक पातळीवर रस्ते, रनवे आदी कामे करायची होती त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन रखडले.

हेही वाचा: राजकारणात पुन्हा सक्रिय होणार; कुणबी मेळाव्यात गीतेंची मोठी घोषणा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले आहे तर दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांनीही याच दिवशी विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत प्रभू यांना विचारले असता आपल्याला या विमानतळाच्या सद्यःस्थितीबाबत काही माहिती नाही. कोणी जाहीर केले असेल तर त्यानुसार होईल. त्यामुळे त्यावर मी अधिक टिपण्णी करणार नाही असे स्पष्ट केले. यावर माजी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांना या विमानतळाच्या उद्घाटनाबाबत कल्पना नाही हे कसे असू शकेल असे विचारले असता ते म्हणाले, सरकार एवढं मोठ आहे. उद्घाटनाची तारीख कोणीतरी ठरविली असेल. प्रत्येक गोष्ट राज्यसभा सदस्यांना कळविण्याची गरज नसते तशी पद्धत आपल्याकडे नाही असे सांगत प्रभू यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.

loading image
go to top