चिपळूण : जंगलतोड, अतिक्रमणे महापुराला कारणीभूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chipalun

चिपळूण : जंगलतोड, अतिक्रमणे महापुराला कारणीभूत

चिपळूण : शहरात पूरस्थिती निर्माण होण्यास अपवादात्मकरीत्या पडणारा मुसळधार पाऊस हे महत्त्वाचे कारण असले तरी शहरात वाढलेली लोकवस्ती, मोकळ्या जागांवर झालेले अतिक्रमण, नदीपात्रालगतची बांधकामे, जमीन सपाटीकरण आणि सुधारणा यासाठी निरनिराळ्या ठिकाणी केलेली खोदकामे व भराव हीदेखील प्रमुख कारणे आहेत, असा अहवाल मोडक समितीने शासनाला दिला आहे.

चिपळूण शहरात गेल्या वर्षी जुलैमध्ये आलेल्या पुराची नेमकी कारणे काय, याबाबत अभ्यास करण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रमुख अभियंता दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची स्थापना केली होती. या अभ्यासगटाने सरकारला अहवाल सादर केला आहे. कोळकेवाडी धरणातून विसर्ग झालेले पाणी या पुरासाठी कारणीभूत ठरले नसल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात चार ते पाच दशकांपासून अव्याहत सुरू असलेली जंगलतोड आणि त्यामुळे होणारी डोंगरदऱ्यांची धूप याचा फटका चिपळूण शहराला बसत असून, या परिसरात येणाऱ्या पुराचे हे अप्रत्यक्ष कारण असल्याचे अभ्यास गटाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

याचबरोबर पुरासाठीच्या अप्रत्यक्ष कारणांचाही यामध्ये उहापोह केला आहे. सततच्या वृक्षतोडीमुळे जंगलांचे हिरवे संरक्षक कवच आक्रसल्याने डोंगर कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. यातून मातीची उलथापालथ आणि धूप होते हे कारणही नमूद केले आहे. तसेच सह्याद्रीच्या खोऱ्यातील आणि सपाटीवरील भागात विकास प्रकल्पांसाठी, खाणप्रकल्प, महामार्ग, रेल्वे जंगलतोडीसाठी वाहतुकीसाठी केले जाणारे रस्ते इत्यादीसाठी होणारे खोदकामही यास कारणीभूत असल्याचे अभ्यासगटाने स्पष्ट केले आहे.

गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून नदीपात्रातून पाणी वाहून नेण्याची क्षमता ६० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे, असेही यातून समोर आले आहे. यावर वेळीच उपयायोजना केली नाही तर पुढील तीन ते पाच वर्षांत पुन्हा तेवढ्याच पटीत नदीपात्रात गाळ साठण्याची प्रक्रिया होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६च्या चौपदीकरणाचे बांधकाम सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर चालू आहे. या बांधकामाच्या मातीचा भराव व नदीवरील पुलांची बांधकामे यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होऊन पाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूला तुंबून राहते, हे निदर्शनास आल्याचे अभ्यासगटाने अहवालात नमूद केले आहे. हे रोखण्यासाठी काम करताना संबंधित यंत्रणेने नदीची वहनक्षमता व अपेक्षित असणारा पूर याप्रमाणे पाण्याचा निचरा होण्यासाठी पूल व मोरी बांधकामांची तरतूद करणे आवश्यक आहे.

पूररेषांचा नव्याने अभ्यास आवश्यक

निळ्या आणि लाल रेषांची आखणी झाल्यानंतर कोणतीही बांधकामे करताना निरनिराळ्या खात्यांच्या समन्वयाने अशी बांधकामे होणे अपेक्षित आहे. याबाबत स्वतंत्र व विस्तृत अभ्यास करण्याची गरज अभ्यासगटाने व्यक्त केली आहे. एकात्मिक खारे आराखडा व नियोजन करून स्थापत्य अभियांत्रिकी, भूवैज्ञानिक पर्यावरण तज्ज्ञ यांच्या पडताळणी व शिफारशीनुसार कार्यक्रम हाती घ्यावा, अशी सूचनाही अभ्यासगटाने केली आहे.

Web Title: Chiplun Deforestation Encroachments Cause Floods

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..