चिपळूण : धडकी महापुराची; तयारी स्थलांतराची! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chiplun flood free Migratory 4 months of monsoon rent increases konkan

चिपळूण : धडकी महापुराची; तयारी स्थलांतराची!

चिपळूण : गेली ४ महिने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळउपशाची प्रक्रिया अहोरात्र सुरू असली तरी आजही चिपळूण पूरमुक्त झाल्याचा दावा कोणीही करू शकणार नाही. तेव्हा या वर्षीही महापुराच्या शक्यतेने नागरिकांनी आतापासून सुरक्षित ठिकाणी पावसाळ्याचे ४ महिने स्थलांतरित होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी तळमजला सोडून उंचीवरच्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी काहींची लगबग सुरू आहे. त्यातच खोली व सदनिकेची भाडेवाढही झाल्याने अनेकांची कोंडी होऊ लागली आहे.

चिपळूण शहर व परिसरात २२ जुलै २०२१ ला आलेल्या महापुरात होत्याचे नव्हते झाले होते. २००५ च्या महापुरात गाठलेल्या उंचीपेक्षाही अधिक उंची गाठल्याने हाहाकार उडाला होता. त्यातून जीवित व वित्तहानी झाली. त्याशिवाय अनेक लोकवस्तीला फटकाही बसला. वाशिष्ठी व शिवनदी काठावरील नागरिकांना गाळ व अन्य समस्यांना सामोरे जावे लागले होते. या घटनेला आता जवळजवळ वर्ष होत आले असले तरी या प्रसंगातून अजूनही अनेक कुटुंबे सावरलेले नाहीत. त्यातच आता पुन्हा एकदा पावसाची चाहूल लागल्याने नदीकाठावरील नागरिकांसह शहरातील रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. काहींनी तर पावसाळ्याची ४ महिने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. आतापासूनच एखादी खोली अथवा सदनिका भाड्याने घेण्यासाठी शोध सुरू केला आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ उपसा अशक्य

अजूनही शहरातील वाशिष्ठी व शिवनदीतील गाळउपशाचे काम सुरू आहे; परंतु प्रशासनाने गाळ उपशासाठी निश्चित केलेले साडेसात लाख घनमिटरचे उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. त्यातच अनेक ठिकाणी गाळ किनाऱ्यावर असल्याने तो महापुराच्या वेळी नदीपात्रात किंवा नजीकच्या वस्तीत वाहून जाण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत काढलेल्या गाळामुळे चिपळूण पूरमुक्त होईल, याची शाश्वती कोणी देण्यास तयार नाही. त्याशिवाय पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ उपसा अशक्य असून या कालावधीत किनाऱ्यावरील गाळ उचलणेही कठीण बनले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही महापुराविषयी भीतीचे वातावरण कायम असून ते पावसाळ्यात सुरक्षित निवारा शोधू लागले आहेत.

सदनिकांचे भाडे वाढले

शहरातील ९० टक्के भाग हा महापुराने व्यापला होता. त्यामुळे केवळ १० टक्के भाग सुरक्षित राहिल्याने शहरातील रावतळे, मतेवाडी, ओझरवाडी, शिवाजीनगर, पागझरी या सुरक्षित भागात स्थलांतरित होत आहेत. त्याशिवाय शहरालगतच्या कापसाळ, मिरजोळी, शिरळ, वालोपे, पेढे या ठिकाणी तात्पुरत्या वास्तव्यासाठी काहींनी चौकशी सुरू केली आहे. या परिस्थितीमुळे सुरक्षित व उंच ठिकाणी असलेल्या भागातील खोली व सदनिकांचे भाड्याचे दर वाढू लागले आहेत. पूर्वी २ हजार रुपये भाड्याने मिळणारी खोली आता साडेतीन ते चार हजार तर सदनिका ५ ते ६ हजार प्रति महिना इतके वाढले आहे.

एक नजर..

  • २२ जुलै २०२१ रोजीच्या महापुरात झाले होत्याचे नव्हते

  • जीवित व वित्तहानी; अनेक लोकवस्तीला फटकाही

  • वाशिष्ठी व शिवनदी काठावरील नागरिकांना विविध समस्या

  • या प्रसंगातून अजूनही अनेक कुटुंबे सावरलेले नाहीत

  • आता पुन्हा एकदा पावसाची चाहूल; संबंधित नागरिक भयग्रस्त

  • तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये चलबिचल

  • काहींचा ४ महिने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरिताचा निर्णय

  • एखादी खोली अथवा सदनिका भाड्याने घेण्याचा प्रयत्न

Web Title: Chiplun Flood Free Migratory 4 Months Of Monsoon Rent Increases Konkan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top