
चिपळूण : परशुराम घाटातील ऐतिहासिक पाखाडी तुटली
चिपळूण: पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील डोंगरकटाईचे काम मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्यासाठी युद्धपातळीवर सुरू आहे. या डोंगरकटाईच्या कामात पेढे व परशुरामला जोडणारी आणि जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी ४०० वर्षांपूर्वी बांधलेली, वर्षानुवर्षे हजारो वारकरी, ग्रामस्थ, शाळकरी मुले व श्री क्षेत्र परशुरामला येणाऱ्या भाविकांची कांची ऐतिहासिक पाखाडीही तोडण्यात आली. परिणामी येथील नियमित दळणवळणाची समस्या निर्माण झाली. त्यावर तोडगा म्हणून तोडलेल्या पाखाडीच्या रस्त्यावर पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्या पाहणी दौऱ्यात त्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
परशुराम हे गाव डोंगरावर वसलेले असून, जुन्या महामार्गाच्या अगदी ७० ते ८० मीटरवर ग्रामस्थांची घरे आहेत. चौपदरीकरणात डोंगर पोखरल्याने या घरांना धोका निर्माण झाला आहे. यातच पेढे व परशुरामला जोडणारी पाखाडी जी जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजेच सुमारे ४०० वर्षांपूर्वी बांधली होती. जिचा वापर हजारो वारकरी, ग्रामस्थ शाळकरी मुलं व भाविक वर्षानुवर्षे करीत आले आहेत.
तीच पाखाडी डोंगरखोदाई करताना तोडण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. तोडलेल्या पाखाडीच्या ठिकाणी पादचारी पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थ आणि देवस्थानने केली. महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात चौपदरीकरणाची पाहणी केली. परशुराम घाट पाहणीवेळी ग्रामस्थांनीही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. यानंतर शेलार यांनी वार्षिक पुरवणी यादीमध्ये पादचारी पुलाचा समावेश करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
अडीच मीटर रुंदीच्या पुलाबाबत चर्चा
साधारणपणे दोन मीटर रुंदीचा पादचारी पूल असतो; मात्र येथील वर्दळ आणि देवस्थान लक्षात घेऊन हा पूल अडीच मीटर रुंदीचा करण्याबाबत चर्चा झाली. त्यादृष्टीने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार या पादचारी पुलाचे अंदाजपत्रक केले जाणार आहे. पूल मंजूर झाल्याने घाटातील रस्ता क्रॉस करताना अपघात टळण्यास मदत होणार आहे.
Web Title: Chiplun Historical Pakhadi Parashuram Ghat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..