चिपळूण : महापुराचे खापर फोडण्यासाठी कोळकेवाडी धरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोळकेवाडी धरण

चिपळूण : महापुराचे खापर फोडण्यासाठी कोळकेवाडी धरण

चिपळूणला पूर आला की, दोषाचे खापर अज्ञानातून किंवा जाणीवपूर्वक कोळकेवाडी धरणावर फोडले जाते. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर आला, असेही म्हटले जाते. गेल्या वर्षीच्या महापुरानंतर याबाबत जोरात ओरड अन‌्‌ आरोप सुरू झाले. गाळ उपसा अन्‌ पाणी सोडल्याने पुराची तीव्रता वाढली, असे तज्ज्ञांच्या थाटात कोणीही सांगू लागला. पाटबंधारे खात्याकडून या आरोपात तथ्य नाही, तांत्रिकदृष्ट्या हे कसे चुकीचे आहे, हे दाखवून देण्यात आले. मात्र, आरोप होतच राहिले. यामुळे राज्यकर्त्यांनी नेहमीच्या शैलीत अभ्यास करण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे धरणातून पाणी सोडल्याने पूर ही थिअरी खरी की खोटी, हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करण्याची जबाबदारी शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीची आहे. या समितीची पहिली बैठक उद्या पोफळी येथे होणार आहे. या बैठकीबाबत सामान्याप्रमाणे जाणत्यांनाही उत्सुकता आहे.

मुझफ्फर खान, चिपळूण

२१ जुलै २०२१ च्या रात्रीपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर २२ जुलैला चिपळूण शहर आणि परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. या दरम्यान कोळकेवाडी धरणातून चिपळूणच्या दिशेने किती पाणी सोडले गेले. त्या पाण्याने शहरात पूर येऊ शकतो का, याचे स्पष्टीकरण अभ्यासगट समितीने दिले तर कोळकेवाडी धरणाच्या बाबतीत लोकांचा असलेला मोठा गैरसमज दूर होऊ शकतो. ही समिती काय निष्कर्ष काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२० ते २२ जुलैदरम्यान विक्रमी पावसाची नोंद

डब्ल्यूआरडीच्या नोंदीप्रमाणे २१ जुलै २०२१ ला सरासरी ४०० आणि २२ जुलैला सरासरी ७०० मि. मी. पाऊस झाला. इतका पाऊस यापूर्वीच्या इतिहासात कधीही पडलेला नाही आणि हे पावसाचे प्रमाण पोफळी, अलोरे, कोळकेवाडी या सह्याद्रीच्या खोऱ्यात समान होते. या पावसाचे पाणी ढगफुटी झाल्याप्रमाणे कोळकेवाडी धरणाच्या दिशेने वाहिले. त्या दिवशी विजेची मागणी नसल्यामुळे आणि अलोरे परिसरात दरड कोसळल्यामुळे टप्पा एक, दोन आणि चार बंद होते. कोळकेवाडी धरणात येणाऱ्या पाण्याचा समतोल राखला गेला पाहिजे, म्हणून या धरणातून वीजनिर्मिती करून चिपळूणच्या दिशेने पाणी सोडले जात होते. अरबी समुद्राला भरती असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील वीजनिर्मिती प्रकल्पात पाणी मागे येत होते. धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात आले नाही.

कोळकेवाडीच्या पाण्यामुळे

खरंच चिपळुणात पूर येतो का?

महापुराच्या काळात कोळकेवाडी धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात पाटबंधारे विभागाला अपयश आल्यामुळे चिपळुणात महापूर आला, असा आरोप नागरिक करत आहेत; मात्र शासन हा आरोप स्वीकारत नाही. गेल्या शंभर वर्षांत जेवढा पाऊस झाला नाही त्याहीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस २० ते २२ जुलै दरम्यान झाला. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून पुराचे खापर कोयना आणि कोळकेवाडी धरणावर फोडले जाते. कोयना धरणातील पाणी सांडव्यावरून सोडलेले तर ते कराड, सांगली या शहरामार्गे कर्नाटक, आंध्रमध्ये जाते ते चिपळूणकडे येत नाही. धरणातून सरासरी केवळ ०.१९ अब्ज घनफूट पाणी प्रतिदिन पोफळीकडे वर्षभर सोडले जाते. वीजनिर्मितीनंतर हे पाणी वशिष्ठीत जाते. हा विसर्ग तीन हजार घनफूट प्रतिसेकंद (क्युसेक्स) ते जास्तीत जास्त आठ हजार क्युसेक्स इतकाच असतो. पावसाळ्यात विजेची मागणी कमी असल्यामुळे तो कमी असतो. या तुलनेत चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते, तेव्हा वशिष्ठी आणि इतर उपनद्या यांचा एकत्रित विसर्ग दोन लाख क्युसेक्सपेक्षा जास्त असतो. त्यामुळे दोन लाख क्युसेक्स पाण्याच्या तुलनेत आठ हजार क्युसेक्स पाण्यामुळे पूर येऊ शकतो का, हा निरुत्तर करणारा सवाल आहे. याचा अभ्यास समितीने केला पाहिजे.

शासनाचा अहवाल सांगतो

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कुंभार्ली आणि रघुवीर घाटात प्रचंड पर्जन्यमान झाले. पश्चिमेकडील मुक्त पाणलोट क्षेत्रामधून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही पूरस्थिती उद्धवली.

भरतीच्या पाण्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा समुद्रामध्ये निचरा होऊ शकलेला नाही. त्यामुळे पाणीपातळी ७. ५० मीटर झाली. तरीही अंदाजे पाणी ७ ते ८ हजार क्युसेक्स इतका विसर्ग नदीत सुरू होता.

कोयनेच्या पाण्यामुळे पूर उतरण्यास विलंब

२० आणि २१ जुलैला कोळकेवाडी धरणातून वीजनिर्मिती करून ३ हजार क्युसेक्स तर २२ जुलैला ८ हजार ६२२ क्युसेक्स इतका विर्ग सुरू होता. २२ जुलैला २१. १० द. ल. घ. मी. तर २३ जुलैला १०. ८ द. ल. घ. मी. इतकेच पाणी कोळकेवाडीतून वाशिष्ठी नदीमध्ये सोडण्यात आले. कोळकेवाडी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आलेले नाही; परंतु कोळकेवाडी धरणाच्या पूर्ण संचय पातळीपर्यंत पाणीसाठा पोहोचत असल्याने त्यांनी वीजनिर्मिती करून पाणी नियंत्रित करणे आवश्यकच होते. या विसर्गामुळे पूरस्थिती उद्भवली नाही; परंतु विसर्ग हा सतत चालू असल्याने पूर उतरण्यास थोडासा विलंब झाला, अशी एक थिअरी पाटबंधारे खात्याकडून सांगितली जाते.

कुणालातरी केलेला बळीचा बकरा

कोयना नदी पूर्व वाहिनी नदी असून ती कृष्णेला कराडजवळ मिळते, आणि कोयनेचं पुराचं सांडव्यावरून सोडलेलं पाणी कराड, सांगली या शहरांमार्गे कर्नाटक, आंध्र या राज्यात वाहत जातं. कोयना धरणातून प्रतिदिनी सरासरी केवळ ०. १९ अब्जघनफूट प्रतिदिन एवढं पाणी पूर्ण वर्षभर पश्चिमेकडे वळवून वीज निर्मिती केली जाते. या वीज निर्मितीमुळे प्रतिदिनी वशिष्ठी नदीत सोडला जाणारा विसर्ग ३००० घनफूट प्रतिसेकंद (क्युसेक्स) ते जास्तीत जास्त ८००० क्युसेक्स इतकाच असतो. पावसाळ्यात विजेची मागणी कमी असल्यामुळे तो कमीत कमी असतो. या तुलनेत जेव्हा चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते, तेव्हा वाशिष्ठी आणि इतर उपनद्या यांचा एकत्रित विसर्ग २ लक्ष क्युसेक्स पेक्षा जास्त असतो. त्यामुळे २ लक्ष क्युसेक्स पाण्याच्या तुलनेत ८००० क्युसेक्स पाण्यामुळे पूर आला, असं म्हणणं हे केवळ हास्यास्पदच नाही तर इतर दोष झाकण्यासाठी कुणालातरी केलेला बळीचा बकरा आहे, ही गोष्ट उघड आहे, असा याआधीचा सरकारी दावा आहे.

मुक्त पाणलोटातील निचऱ्यामुळे पूर

धरणात पाणी तयार करण्याची कोणतीही यंत्रणा नसते. सारी धरणं केवळ पावसाचं येणार पाणी अडवून त्याचा वर्षभर पाणी पुरवठ्यासाठी साठा करतात, हे सर्वांना माहिती आहे, आणि मान्य आहे. अशी धरणं जर नसती तर असे येणारे पूर आणि अतिवृष्टी तात्काळ नदीतून वाहून गेली असती आणि नंतर वर्षभर नद्या कोरड्या राहिल्या असत्या. उलट जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात येणारे बहुतांश पूर धरणांच्या मागे अडवून धरल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण व्हायची शक्यता जवळ जवळ नसते. तसेच हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की एकूण पाणलोट क्षेत्राच्या केवळ १५ टक्के एवढंच पाणलोट क्षेत्र धरणांच्या मागे अडवलं जातं. उर्वरित ८५ टक्के मुक्त पाणलोट क्षेत्रातून होणारा पाण्याचा निचरा हा नदी खोऱ्यातून होतो आणि त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात मुक्त पाणलोटातील निचऱ्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. त्यात धरणामागील पाण्याचा कोणताही सहभाग नसतो, ही बाब आरोप करणाऱ्यांनी लक्षात घेतली होती वा नाही, यावर उहापोह होण्याची गरज आहे.

एक नजर..

कोळकेवाडीतून वाशिष्ठी नदीमध्ये सोडलेले पाणी

२२ जुलैलाः २१. १० द. ल. घ. मी.

२३ जुलैलाः १०. ८ द. ल. घ. मी.

एक दृष्टिक्षेप..

एकूण पाणलोट क्षेत्राच्या केवळ १५ टक्केच पाणलोट क्षेत्र धरणांमागे अडवलं जातं

उर्वरित ८५ टक्के मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा निचरा हा नदी खोऱ्यातून होतो

Web Title: Chiplun Kolkewadi Dam Break Floodwaters Mahapura

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top