दाभोळ खाडी परिसरात प्रदूषणात वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

जैवविविधतेवर परिणाम - सांडपाण्यामुळे ८६ गावांतील पारंपरिक मासेमारी संकटात

जैवविविधतेवर परिणाम - सांडपाण्यामुळे ८६ गावांतील पारंपरिक मासेमारी संकटात
चिपळूण - शहरातून खाडीत सोडण्यात येणारे सांडपाणी, नागरिकांकडून खाडीत टाकण्यात येणारा घरगुती कचरा, कारखान्यांचे रासायनिक पाणी आदींमुळे दाभोळ खाडीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे खाडीतील माशांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खाडीतील पाण्यात गाळ साचत चालल्याने याचा परिणाम खाडीतील जैवविविधतेवर होत आहे. खाडी किनारच्या तिवरांसाठी देखील हे प्रदूषण हानिकारक ठरत आहे. लोकसहभागातून खाडीचे संवर्धन व जनजागरण करण्याची वेळ आली आहे. प्रदूषणविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. 

खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण आणि गुहागर तालुक्‍यांतील नद्या, उपनद्यांचे प्रवाह दाभोळ खाडीला मिळतात. वाढत्या शहरीकरणाचा परिणाम दाभोळ खाडीवर होत आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानदार छुप्या मार्गाने रासायनिक पाणी दाभोळ खाडीत सोडतात. हा प्रकार स्थानिक नागरिकांनी एमपीसीबीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकारी कंपनीवर तात्पुरत्या स्वरूपात बंदीची कारवाई करतात. पुन्हा येरे माझ्या मागल्याचा प्रकार सुरू राहतो. त्यामुळे खाडी किनारी असलेल्या ८६ गावांतील नागरिकांचा पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय संकटात आला आहे. कारखानदार, प्रशासकीय अधिकारी आणि प्रदूषणाचा पुळका घेऊन मिरवणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये होणाऱ्या सौदेबाजीमुळे दाभोळ खाडी आणि खाडीवर अवलंबून असलेल्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. मच्छीमारी व्यवसाय संकटात आल्यानंतर शासनाकडून भरपाई मिळवून देण्यात तसेच पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यास येथील लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. खाडी दूषित झाल्यामुळे माशांची संख्या कमी झाली. त्यामुळे मासेमारीसाठी जीव धोक्‍यात घालून खोलवर जावे लागते. प्रदूषणामुळे खाडीतील ऑक्‍सिजनचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या व इतर कचरा दिसू लागला आहे. प्रदूषणामुळे खाडीत दुर्गंधीही पसरली आहे.

खाडीतील मासे, पक्षी, खारफुटी आदी जैवविविधतेचे दर्शन घडावे यासाठी खाडी दूषित होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. स्वच्छ खाडी ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जलचरांना मोकळा श्‍वास घेण्यासाठी निळीशार खाडी गरजेची आहे. निसर्गाचे नियम पाळल्यास ही किमया आपणच करू शकतो. 
- समीर कोवळे, पर्यावरण अभ्यासक 

दूषित पाण्यामुळे खाडीकिनारी मासे येत नाहीत. भरतीच्या पाण्याबरोबर आलेले मासे लगेच निघून जातात. खाडीत टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे मासे किनाऱ्यावर थांबत नाहीत. मासेमारीसाठी जाळे टाकल्यावर प्लास्टिक पाहून मासे घाबरतात. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होते. 
- अजित तांबोली, मालदोली भोईवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiplun konkan news Increase in pollution in Dabhol valley