चिपळूण : प्रशासनाच्या कारवाईची चुकीची वेळ ; नगराध्यक्षा

मुझफ्फर खान
Tuesday, 17 November 2020

कोरोनाच्या परिस्थितीमुळे शहरातील छोटे व्यावसायिक व खोकेधारक त्रस्त आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिपळूण - शहरातील अनधिकृत खोक्यांवर पालिका प्रशासनाने चुकीच्यावेळी कारवाई केली. मी खोकेधारकांच्या पाठीशी आहे. अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी दिली. शहरातील अनधिकृत खोकेधारकांना त्यांचे खोके हटवण्यासाठी प्रशासनाने 15 दिवसाची मुदत द्यावी असेही त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, गेल्या आठ महिन्यापासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे शहरातील छोटे व्यावसायिक व खोकेधारक त्रस्त आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच त्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे. आज प्रत्येकावर संकट कोसळले आहे. या संकटातून कोणीही सुटलेलं नाही. अशा स्थितीत प्रशासनाने कारवाईसाठी ही वेळ साधायला नको होती. अत्यंत चुकीच्या वेळी प्रशासनाने ही कारवाई केली आहे. अजूनही वेळ गेली नाही. प्रशासनाने या व्यवसायिकांना किमान 15 दिवसांची मुदत द्यावी. याच कालावधीत प्रशासनाने निश्चित केलेल्या हॉकर्स झोनअंतर्गत पूर्व तयारी करून त्यांची पर्यायी व्यवस्था करावी. त्यासाठी प्रशासनाला नगराध्यक्षा म्हणून हवी ती मदत करायला तयार आहे. मात्र अशापद्धतीची चुकीची कारवाई होणार असेल, तर आपण या व्यावसायिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. येत्या 15 दिवसांत त्यांना न्याय मिळवून देण्याची आपली जबाबदारी राहील. प्रशासनानेही पोटासाठी कष्ट करून व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्यापेक्षा खडस शॉपिंग मॉल सारख्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. उच्च न्यायालयाने स्थगिती देऊनही प्रशासन या इमारतीबाबत कारवाई करू शकले नाही. येथे अनेक अवैध धंदे सुरु असताना दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाने आधी अशा ठिकाणी कायदा दाखवावा. असेही खेराडे यांनी सांगितले. 

हे पण वाचा - माजी नगरसेवकाचा खोक्यावर चढून आत्महत्येचा इशारा

शहरात अनेक अनधिकृत आणि बेकायदेशीर व्यवसाय चालतात. त्यामुळे अनेक संसार उद्धवस्थ झाले आहेत. आज प्रत्येकावर संकट आले आहे. कोरोनाच्या काळात लोकांची उपासणार व्हायची वेळ आली आहे. छोटे व्यवसायिक कष्ट करून उदरनिर्वाह करतात. त्यांना लवकरच फेरीवाला धोरणच्या माध्यमातून न्याय दिला जाईल.

-सुरेखा खेराडे, नगराध्यक्षा चिपळूण 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chiplun Mayor surekha khade comment on Unauthorized construction