
चिपळूण : भाजपची महावितरणवर धडक
चिपळूण : शहारातील वीजपुरवठ्याविषयी निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत सोमवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरण कार्यावर धडक दिली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करताना मुरादपूर येथील सबस्टेशनमध्ये पुराचे पाणी घुसते. त्यामुळे पूरपरिस्थितीत शहरातील वीजपुरवठा खंडित होतो. त्यासाठी येथे पर्यायी उपाययोजना करण्याची प्रमुख मागणी निवेदनाद्वारे केली. याबाबतचे निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियंता हर्षितकुमार वाकोडे यांना देण्यात आले आहे.
महावितरणकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, काही कामे केली जात आहेत. परंतु, महावितरणविषयी शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याविषयी भाजपने शहराध्यक्ष आशिष खातू यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत समस्यांचा पाढा वाचण्यात आला. शहरातील तिन्ही केंद्रांवर तक्रार निवारणासाठी २४ तास फोन उपलब्ध करावा, त्याची माहिती नागरिकांना देण्यात यावी, महावितरणचे अधिकारी व अभियंता हे वेळेत फोन उचलत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. नागरिकांना वीजपुरवठाबाबतची नेमकी माहिती मिळत नाही, तेव्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन उचलण्याची सूचना देण्यात यावी, आदी मागण्या केल्या. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वाकोडे यांनी मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहर चिटणीस विनायक वरवडेकर, दीपा देवळेकर, राम शिंदे, परेश चितळे, प्रभंजन पिंपूटकर, निखिल कील्लेकर, प्रणय वाडकर, आशिष जोगळेकर, सुधीर पानकर, जतिन घटे, उल्हास भोसले, आमिर बाचीम, मंदार कदम, अमेय सुर्वे, शीतल रानडे, उपेंन्द्र बर्वे आदी उपस्थित होते.
विविध मागण्या अशा..
शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा तसेच मुरादपूर सबस्टेशनमध्ये पुराचे पाणी घुसते. परिणामी, येथून शहरात वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे येथे योग्य उपाययोजना करावी. मुरादपूर सबस्टेशनला जाणारा रस्ता करण्यात यावा. शहरासाठी असलेली ३३ केव्ही वीज पुरवठा लाईन जीर्ण झाली आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर बदलण्यात यावी तसेच पावसाळ्याच्या कालावधीत अत्यावश्यक यंत्रणेची तयारी ठेवावी, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.
Web Title: Chiplun Uninterrupted Power Demand Bjp Attack Msedcl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..