esakal | नियम धाब्यावर; सावंतवाडी बाजारपेठेत तोबा गर्दी 

बोलून बातमी शोधा

citizens crowd market sawantwadi konkan sindhudurg

शनिवार व रविवार दोन दिवस व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. त्यामुळे आज बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीच्या रुपाने त्याचा परिणाम दिसून आला.

नियम धाब्यावर; सावंतवाडी बाजारपेठेत तोबा गर्दी 

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाउन व मंगळवारनंतर सरसकट लॉकडाउनची शक्‍यता आणि गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजारपेठेत खरेदीसाठी आज तोबा गर्दी पाहायला मिळाली. कुठलेही सामाजिक अंतर व नियमांचे पालन न करता बाजारपेठेत व दुकानांमध्ये झालेली ही गर्दी कोरोना प्रादुर्भावास कारणीभूत ठरू शकते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. 
शनिवार व रविवार दोन दिवस व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेऊन कडकडीत बंद पाळला. त्यामुळे आज बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीच्या रुपाने त्याचा परिणाम दिसून आला.

उद्या (ता. 13) येणारा गुढीपाडवा आणि 14 एप्रिलला लॉकडाउनची होणारी घोषणा लक्षात घेता खेड्यापाड्यातील तसेच शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडत बाजारपेठेत गर्दी केली. पाडव्याचा मुहूर्त काढत अनेकांनी नवनवीन वस्तू खरेदीसाठी उत्सुकता दाखविली होती. त्यामुळे बाजारात इलेक्‍ट्रॉनिक व इलेक्‍ट्रीक तसेच कपड्याच्या, भांड्याच्या व सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातही गर्दी दिसून आली. एकूणच आजच्या दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले. 

नियमांची ऐशीतैशी 
गतवर्षी कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउन केले होते. त्यामुळे एकूणच आर्थिक व्यवस्थाच कोलमडली होती. सद्यस्थितीत पुन्हा वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी येत्या बुधवारी लॉकडाउनची घोषणा होणार आहे, हे लॉकडाउन किती दिवसाचे असेल, हे निश्‍चित नसल्याने आज अनेकांनी बाजारात धाव घेतली. एकीकडे व्यापारी लॉकडाउन नको; पण कडक निर्बंध लादा, असे सांगतात. मात्र आज कुठलेच व्यापारी नियम पाळताना दिसले नाहीत. दुकानात होणारी गर्दी कोरोनाला आंमत्रण देणारी ठरली. 

संपादन - राहुल पाटील