
पाली : शहरातील हटाळेश्वर चौक ते बस स्थानक रस्त्यावरील व्यापारी अतिक्रमण हटविण्याची मागणी पालीतील नागरिकांनी केली असून, यासाठी शेकडो सह्यांची मोहीम राबवत नगरपंचायत कार्यालयाला निवेदन सादर केले होते. नागरिकांनी वेळीच कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांनी अखेर सोमवारी (ता. 19) नगरपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. संध्याकाळी उशिरापर्यंत याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही.