सावंतवाडीकर "हेल्दी', आरोग्य सर्व्हे पूर्णत्वाकडे

भूषण आरोसकर
Thursday, 22 October 2020

संपूर्ण शहरात झालेल्या तपासणी सर्व्हेत 18 हजार 600 नागरिकांना मागे फक्त 776 नागरिक अनफिट असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. उमेश मसुरकर यांनी दिली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अंतर्गत येथील पालिकेकडून दुसऱ्या टप्प्यातील सर्व्हे जवळपास पूर्ण होत आला आहे. दोन्ही टप्प्यातील सर्वेक्षणांमधून सावंतवाडी जनतेचे आरोग्य हेल्दी असल्याचे पुढे आले आहे. संपूर्ण शहरात झालेल्या तपासणी सर्व्हेत 18 हजार 600 नागरिकांना मागे फक्त 776 नागरिक अनफिट असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. उमेश मसुरकर यांनी दिली. 

शहरातील जनतेने कोरोना पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाच्या नियमांचे पालन करत नियमित मास्क वापरण्यावर भर दिला आहे. इतर नियमावलीचे पालन केल्याने शहरात कोरोना साथ आटोक्‍यात आणण्यात यशस्वी झालो, असेही त्यांनी सांगितले. शासनाकडून सुरू असलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या सर्वेक्षणाबाबत डॉ. मसुरकर यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. 

ते म्हणाले, ""शहरामध्ये 23 हजार 500 एवढी लोकसंख्या आहे. शासनाने ठरवून दिलेल्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हा कार्यक्रम राबवताना आणि तो यशस्वी करण्यासाठी पालिकेचे नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी संतोष जिरगे व सर्व नगरसेवकांनी योग्य नियोजन केल्याने आज आम्ही पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्याचे कामही पूर्णत्वाकडे आहे. या सभेसाठी तब्बल कर्मचाऱ्यांच्या 10 टीम कार्यरत आहेत. त्यामुळे पहिली फेरी 6 ऑक्‍टोबरला पूर्ण केली. यामध्ये 7 हजार कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचलो यात 23 हजार 500 लोकसंख्येपैकी 18 हजार 600 नागरिकांची तपासणी करण्यात आली.

यामध्ये ऑक्‍सीमिटर, थर्मामीटर आधीचा वापर करुन हा सर्व्हे पुर्ण करण्यात आला. दुसऱ्या टप्प्याचा सर्व्हेचे काम सुरू असून जवळपास 59 टक्के कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यामध्ये 4 हजार 112 कुटुंब तर 12 हजार 672 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. एकूणच दोन्ही सर्व्हेमधून जवळपास 776 नागरिक आरोग्याच्या विविध आजाराचशी झगडत आहेत. त्यामध्ये डायबिटीस ब्लड प्रेशर तसेच इतर आजारांचा समावेश आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता मिळालेल्या रोग्यांची संख्या ही नगण्य असून सावंतवाडी जनता हेल्दी आहे.'' 

शहरात कोरोना बऱ्यापैकी आटोक्‍यात आला आहे; मात्र कोरोना लक्षणांमध्ये बदल जाणवत असून चव व वास न येणे हेही एक प्रकारे कोरोना असल्याचे लक्षण आहे आणि ते रिपोर्टच्या माध्यमातून समोर आले आहे. असे लक्षणे असल्यास तत्काळ उपचार घ्यावेत. आज शहरातील रुग्णसंख्या 18 आहे तर एकूण 276 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पैकी 238 बरे झाले तर 11 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला. सद्यस्थितीत 6 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये 6 रुग्ण उपचार घेत आहेत तर 17 ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत. 
- डॉ. उमेश मसुरकर, आरोग्य अधिकारी 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Sawantwadi are capable of health