सावधान ! धुळीने होतोय श्‍वसनाचा धोका.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citizens were shocked by the dust on the highway in ratnagiri kokan marathi news

लोटे परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत.

सावधान ! धुळीने होतोय श्‍वसनाचा धोका..

चिपळूण (रत्नागिरी) : लोटे परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. येथून वाहने जावून मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. त्याचा वाहनचालक व प्रवाशांना त्रास होत आहे. मार्गावर मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने समोरून ये-जा करणारी वाहने दिसत नाहीत.

दिवसा वाहनांची लाईट चालू ठेवून प्रवास

त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. वाहन चालकांना दिवसा वाहनांची लाईट चालू ठेवून प्रवास करावा लागतो. भरावाचे काम सुरू असताना धुरळा उडू नये, म्हणून ठेकेदार कंपनीकडून मातीवर पाणी मारणे गरजेचे आहे. मात्र, तशी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात सुरक्षितता बाळगली जात नसल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. यामुळे श्‍वसनाचा देखील त्रास होत आहे. लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.महामार्गाच्या जवळ असलेले दुकान आणि घरांमध्ये धूळ उडत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि व्यापारीही हैराण झाले आहेत. 

हेही वाचा- माजी आमदारांनी आपल्या पत्नीला नंदगडला सोडले आणि.. -

धुरळ्यामुळे अपघाताचा धोका

महामार्गावर प्रचंड धुरळा उडत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक बेजार झाले आहेत. धुरळ्यामुळे समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. ठेकेदाराने वेळीच या संदर्भात योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
-संदीप निंबाळकर, लोटे 

हेही वाचा-  मुंबई करानो गावाला येताव’ मग हे अँप करा डाऊनलोड...

 कामावर वेळेत पोचता येत नाही.. 
चिपळुणातील अनेक कामगार लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये दुचाकीने कामासाठी जातात. त्यांना धुळीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अपघात होऊ नये, म्हणून ते कमी वेगाने वाहन चालवतात. त्यामुळे त्यांना कामावर वेळेत पोचता येत नाही.