मंडणगडात मताधिक्याचे दावे विफल

मंडणगडात मताधिक्याचे दावे विफल

मंडणगडात मताधिक्याचे दावे विफल

महायुती पिछाडीवर ; आघाडीचा वरचष्मा, घोषणांबाबत मतदारांमध्ये उत्सुकता
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ ः लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बांजूनी मंडणगड तालुक्यातून दहा हजारांचे मताधिक्य तर मतदार संघातून २५ हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याची घोषणा करण्यात आली होती. मताधिक्य न मिळाल्यास राजकीय संन्यासाच्या घोषणाही अनेकांकडून करण्यात आल्या होत्या. त्या घोषणांची अंमलबजावणी होणार का? असा प्रश्न येथील मतदारांसमोर उपस्थित झाला आहे.
महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) या तिन्ही पक्षांनी तालुक्यात जबरदस्त वातावरण निर्मिती केली होती. त्यांच्या सभेस मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता मशालीचे मताधिक्य राहणार असल्याची चर्चा रंगली होती. दुसरीकडे तटकरेंची महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पावर) व भाजपा या दोन पक्षांची सर्व मदार शिंदेगट शिवसेनेवर अवलंबून होती. याशिवाय महायुतीची तालुक्यात झालेली एकमेव जाहीर सभा कमी उपस्थितीमुळे चर्चेत होती. महायुतीमधील राष्ट्रवादी व भाजपची तालुक्यातील वाढीव मतदानाची सारी मदार आमदार योगेश कदम यांच्या शिंदेसेनेवर होती. त्यांच्यासाठी ही लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम होती. लोकसभेची निवडणूकच त्यांचे पुढे भविष्य निश्चित करणार, हे स्पष्ट असल्याने आमदार योगेश कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.

आमदार योगेश कदम यांनी तालुक्यातून आठ ते दहा हजार मताधिक्याची घोषणा केली होती. महायुती चार हजाराने पिछाडीवर राहिली. मतदार संघात माजी आमदार संजय कदम गेल्या दीड ते दोन वर्षापासून २०२४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांनी दापोली मतदार संघात अनंत गीते यांना ७७ हजार ५०३ इतकी मते मिळवून दिली तर सुनील तटकरे यांना ६९ हजार ७१ इतकी मते मिळाली. दापोली मतदार संघात अनंत गीते यांना ८ हजार ४३२ इतके मताधिक्य मिळाले. विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र कदम विरुद्ध कदम हे स्पष्ट असल्याने लोकसभेतील पिछाडी आमदार योगेश कदम यांच्यासाठी निश्चितच धोक्याची घंटा मानली जात आहे. तालुक्यातून अनंत गीते यांना १५ हजार ५१७ इतकी मते मिळाली तर सुनील तटकरे यांना ११ हजार ३१६ इतकी मते मिळाली. अनंत गीते यांची आघाडी ४ हजार १ मतांची राहिली. निकालाच्या आकडेवारीने अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. तालुक्यातून दहा हजारांचे मताधिक्य तर मतदार संघातून पंचवीस हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याची दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेली घोषणा वास्तवात खरी ठरलेली नाही.
---------
आमदार कदमांपुढे आव्हान

मतदार संघातून अनंत गीते यांची आघाडी कमी ठेवण्यात यश आल्याने त्याचा फायदा तटकरे यांना निश्चितपणे झाला आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीत तटकरे यांनी मंडणगड तालुक्यातून आघाडी मिळवलेली असल्याने त्यांचे मतदान मागील वेळेपेक्षा निश्चितपणे घटले आहे. दापोली मतदार संघात मोठे संघटन असलेल्या आमदार योगेश कदम यांनाही हा मोठा धक्का आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com