रात्री गारठा तर दिवसा ढगाळ वातावरण

भूषण आरोसकर
Saturday, 28 November 2020

बंगालच्या दक्षिण-पश्‍चिम खाडीत निर्माण झालेल्या चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या गती चक्रीवादळाचा हा परिणाम नसल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. किमान तापमानात पुन्हा वाढ झाली असून 16 अंशानंतर 19 अंशची नोंद आज झाली. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात किमान तापमानात वाढ झाल्याने काहीसा थंडीचा गारठा जाणवू लागला आहे; मात्र दिवसाच्या सुमारास ढगाळ हवामान दिसून येत असल्याने विचित्र वातावरणीय बदल पहावयास मिळत आहे. ढगाळ वातावरण झाल्याने बागातदार मात्र चिंतेत आहेत. बंगालच्या दक्षिण-पश्‍चिम खाडीत निर्माण झालेल्या चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या गती चक्रीवादळाचा हा परिणाम नसल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. किमान तापमानात पुन्हा वाढ झाली असून 16 अंशानंतर 19 अंशची नोंद आज झाली. 

थंडीच्या हंगामाला यंदा वेळेत सुरुवात झाली; मात्र नोव्हेंबर महिना संपत येताच विचित्र वातावरणीय बदल पाहावयास मिळत आहेत. तीन दिवसापूर्वी किमान तापमानात घट झालेली थंडी अचानक गायब झाली होती आणि अधूनमधून ढगाळ वातावरण दिसून येत होते. गेले दोन दिवस ही स्थिती होती; मात्र हवामानाचा अवघ्या चोवीस तासात बदल होवून रात्रीच्या वेळी किमान तापमानात अचानक वाढ झालेली दिसून आली. दिवसा मात्र ढगाळ वातावरण दिसून आले. 

सध्या आंबा व काजू पिकाला मोहराची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यात आंबा व काजूला योग्य थंडी नसल्यास पालवीवर परिणाम होऊ शकतो. किडींचा प्रादुर्भाव नाकारता येत नाही. दिवसभरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे बागायतदार चिंतेत आहे. आज काहीसे निरभ्र वातावरण दिसून आल्याने दिलासा मिळाला. 

किमान तापमान बुधवारी (ता.25) रात्री 16 अंश सेल्सिअस एवढे पोहोचले होते; मात्र गुरूवारी (ता.26) पुन्हा 20 अंश एवढे झाले. किमान तापमानात काहीशी झालेली घट ही दिलासायक असली तरी वारंवार दिवसा होणारे ढगाळ वातावरण मात्र चिंताजनकच आहे. गेल्यावर्षी आंबा व काजू बी ला वातावरणीय बदलाचा फटका बसला. यंदाही आंबा-काजू मोहराची नुकसानीची स्थिती दिसून येत आहे. सर्व काही परिस्थिती हवामानावर अवलंबून असल्याने बागायतदार आंबा, काजू पिकाला पुरेसे सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. 

पिकांचे नुकसान 
गेल्यावर्षी क्‍यार त्या अगोदर ओखी या चक्रीवादळामुळे खरीप हंगामात हे नुकसान झाले होते. त्यासोबतच आंबा-काजू हंगामाच्या तोंडावर हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाल्यामुळे याचा फटका आंबा व काजू पिकांनाही बसला होता. परिणामी पुन्हा पालवी फुटणे व हंगाम लांबवणे यामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. 

पावसाची धास्ती 
गेली दोन वर्षे या नुकसानीस सामोरे जात असलेल्या बागायतदारांना पावसाच्या शिडकाव्याची धास्ती आहे. बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या निवार चक्रीवादळामुळे ही ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. तर अरबी समुद्रात गती चक्रीवादळाची स्थिती या आठवड्यात निर्माण झाली होती. काल ही दोन्ही वादळे पुढे सरकल्याने त्याचा परिणाम कमी झाला. 

ट्‌विटरवरून वादळाची माहिती 
हवामान विभागाच्या तज्ञांनी ट्‌विटरवरून वादळाची माहिती दिली होती. यासोबत त्यांनी उपग्रहावरून ज्याठिकाणी हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे त्याची प्रक्षेपण चित्रही प्रसारित केली होती. कोकण किनारपट्टीवरही काही प्रमाणात दिसून आल्याचे बोलले जात होते; मात्र जिल्ह्यात अद्याप पावसाचा शिडकावा कोठेही झाला नसला तरी मात्र 4 दिवस वातावरणातील बदल जाणवत आहे. 

 

अरबी समुद्रात व दक्षिणेला समुद्रात निर्माण झालेल्या दोन्ही चक्रीवादळाचा कोणताही धोका आता कोकण विभागाला नाही. वातावरणीय बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्याचा फारसा परिणाम आंबा काजूवर होत नसला तरी किडीचा प्रादुर्भाव होण्याची थोडीशी शक्‍यता असते. 
- डॉ. यशवंत मुठाळ, ग्रामीण कृषी मौसम सेवा उद्यानविद्या मुळदे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Climate change in sindhudurg district