तर त्याचा शेतीवर गंभीर परिणाम  होईल : सतीष वाघ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

फार्मास्टिकल, खते व किटक नाशक बनवणार्‍या कंपन्या चालू ठेवल्या नाहीत तर शेती व वैद्यकीय क्षेत्रावर गंभीर परिणाम होतील

चिपळूण (रत्नागिरी) : फार्मास्टिकल, खते व किटक नाशक बनवणार्‍या कंपन्या चालू ठेवल्या नाहीत तर शेती व वैद्यकीय क्षेत्रावर गंभीर परिणाम होतील. अशी भिती लोटेतील उद्योजक आणि सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीचे मालक सतीष वाघ यांनी व्यक्त केली. निवडक मनुष्यबळाचा वापर करून लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्या सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. त्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांचे त्यांनी अभिनंदनही केले. 

परवानगी दिल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांचे अभिनंदन
ते म्हणाले, कोरोनाविषयक सावधानता बाळगत असताना जीवनावश्यक बाब म्हणून किराणा साहित्य, आरोग्य विषयक बाबी निर्मिती करणारी शेती व्यवस्थेला, वैद्यकीय क्षेत्राला पूरक कारखान्याची भूमीका खूप निर्णायक ठरत आहे. लॉक डाऊनच्या काळात कारखाने सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील काही कारखानदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला होता. 

हेही वाचा-नवलच :  ते यायला लागले आता आंब्याच्या गाडीतून...

भविष्यात शेती आणि वैद्यकीय क्षेत्रावर परिणाम 

जिल्हाधिकार्‍यांनी एमआयडीसीकडून त्याबाबतचा अहवाल मागवला त्यानंतर जिल्ह्यातील 30 कारखानदारांना कंपन्या सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर बोलताना श्री. वाघ म्हणाले. जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली असली तरी कामगार येत नसल्यामुळे अनेक कारखान्यांनी उत्पादन सुरू केलेले नाही. मात्र काही कारखानदारांनी सुरक्षेच्या सर्व उपायोजना करत निवडक कामगार ठेवून कारखाने सुरू ठेवले आहेत. कारण फार्मास्टिकल, खते व किटक नाशक बनवणार्‍या कंपन्या सुरू नाही ठेवल्या तर भविष्यात शेती आणि वैद्यकीय क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होतील. 

हेही वाचा-Sakal Impact : कोकणसंदर्भात सुरेश प्रभूंनी मुख्यमंत्र्यांना केले  हे व्टीट.... 

सीईटीपीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी

राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठी विशेष बाब म्हणून 50 कोटीहून अधिक रक्कम लोटेतील सीइटीपी प्रकल्पासाठी दिली होती. याची जाणीव ठेवून सरकारच्या अडचणीच्या काळात आम्ही सीईटीपीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 3 लाख 50 हजार व पंतप्रधान निधीला 3 लाख 50 हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सतीश वाघ यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The closure of Lotte factories will have serious impact on agriculture kokan marathi news