CM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Em eknath shinde group shiv sena ramdas kadam yogesh kadam chiplun politics

CM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तर

चिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दीपक केसरकर यांचा पाठिंबा मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत आणि योगेश कदम शिंदे गटात सामील झाले. केसरकर यांना शिंदे गटाकडून मुख्य प्रवक्तेपद आणि शिक्षणमंत्रिपद देण्यात आले. उदय सामंत यांना नेतेपद आणि उद्योगमंत्रीपद देण्यात आले. सेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाची बाजू मांडताना केसरकर आणि सामंत यांनी नेहमीच संयम पाळला. मात्र, रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंवर कडक शब्दात आणि आक्रमक शैलीत टीका केली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षातील गळती रोखण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा सुरू केली आहे. यावेळी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेत नेतेपदी बढती मिळालेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांचा वारंवार बंडखोर आणि गद्दार असा उल्लेख केला. भास्कर जाधव यांनी रामदास कदम, योगेश कदम आणि उदय सामंत यांच्यावर जहाल शब्दात व्यक्तिगत टीका केली. जाधव यांना उत्तर देण्यासाठी कदम पिता-पुत्रांनी दापोलीत मेळावा घेतला आणि जाधवांसह ठाकरे कुटुंबीयांवर टीका करण्याची संधी साधली.

कोकणात भास्कर जाधव एका बाजूने भाजप आणि शिंदे गटाला अंगावर घेवून आरोप करत सरकारविरोधी वातावरण निर्मिती करत असताना कदम हे शिवसेना स्टाईलने ठाकरे कुटुंबीयांना टार्गेट करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणात शिवसेनेला सुरूंग लावण्याचा करेक्ट कार्यक्रम केला तरी शिवसेनेच्या विरोधात म्हणावी तशी वातावरण निर्मिती होत नाही. त्यामुळे योगेश कदम यांना मंत्रिमंडळात संधी देत कदम पिता-पुत्रांना ताकद देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

संघर्षाची धार कमी करण्यासाठी

१९९६ मध्ये राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आले होते, तेव्हा शिवसेनेकडून कोकणातील आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. राज्यात सत्तेवर आलेले आताचे सरकार हे खऱ्या अर्थाने शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. तोच संदेश यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देण्याची शक्यता आहे. दोन वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केसरकर आणि सामंत यांच्यापेक्षा योगेश कदम यांना अधिक संघर्ष करावे लागणार आहे. तो कमी करण्यासाठी योगेश कदम यांना मंत्रिपद आणि आणखी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मला मंत्रिपद मिळेल किंवा नाही हे मला माहीत नाही; पण मंत्रिपद मिळाले तर ते मी सक्षमपणे सांभाळेन आणि रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक न्याय देण्याचा प्रयत्न करेन.

- योगेश कदम, आमदार, दापोली