देवाच्या नावाने सामूहिक शेती, एकोप्याची शिकवण  

collective farming vayangani village konkan sindhudurg
collective farming vayangani village konkan sindhudurg

आचरा (सिंधुदुर्ग) - मनुष्यबळाचा तुटवडा आणि वाढता खर्च यामुळे शेती परवडत नसल्याची चर्चा आहे. यामुळे पडीक क्षेत्रात वाढ होत आहे; मात्र तालुक्‍यातील वायंगणी येथे उन्हाळ्यात देवाच्या हुकूमावरुन केली जाणारी भातशेती सामूहिक शेतीचा एक उत्कृष्ट आदर्श निर्माण करत आहे. गेली कित्येक वर्षांची ही परंपरा वायंगणी गावात ग्रामस्थ कसोशीने पाळत असून गुरुवारी पौष पौर्णिमेपासून या देवशेतीला वायंगणी मळे भागात सुरवात झाली आहे. शेकडो वायंगणी ग्रामस्थ एकाच वेळी शेतात उतरुन लावणीचे काम करत असल्याने शेतातील हा अनोखा नजारा भविष्यात पर्यटकांनाही आकर्षित करणारा ठरेल. 

वायंगणी गावात शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असून सुमारे 250 एकर क्षेत्रावर ही शेती केली जात आहे. देवाच्या हुकूमावरुन हा मुहूर्त केला जातो. यासाठी वायंगणी गावचे मानकरी एकत्र जमून गावच्या पुरोहिताकडून तीन दिवसांचे मुहूर्त काढतात. या तीन दिवसांतील देवाचा कौल घेऊन एक दिवस ठरवला जातो. जो दिवस ठरला त्या दिवशी मानकरी ग्रामदेवतांना सांगणे करून मुहूर्ताचे भात भिजत घालून प्रथेप्रमाणे रुजत घालतात. त्यानंतरच सगळे ग्रामस्थ भात कोंब येण्यासाठी भिजत घालतात, असे वायंगणीचे ग्रामस्थ रामदास सावंत, उदय दुखंडे यांनी माहिती देताना सांगितले. यावर्षी द्वादशीचा मुहूर्त निश्‍चित केला गेला.

चतुर्थी दिवशी नांगरणी करून पौष पौर्णिमेला पहिल्या लावणीला सुरवात केली आहे. या क्षेत्राचे लावणीसाठी पाच भाग केले आहेत. त्याप्रमाणे लावणी पाच दिवस केली जाते. पाण्याचे नियोजनही त्याप्रमाणे केल्याचे दुखंडे यांनी सांगितले. तयार झालेल्या भाताची कापणीही देवाच्या हुकूमाप्रमाणेच होते. चैत्र पौर्णिमेला वायंगणी गावात वसंतोत्सव साजरा केला जातो. पाच दिवसाच्या उत्सवात ललितोत्सवानंतर सहाव्या दिवशी मंदिरात दुपारी गाव एकत्र येऊन मेळा बसतो. यात कापणीबाबतचा मुहूर्त पुरोहिताच्या साक्षीने ठरविला जातो आणि पुन्हा एकदा वायंगणी गाव एकोप्याने कापणीसाठी मळ्यात उतरतो. पुर्वी नांगरणी करायची त्यादिवशी रात्री बारा वाजताच लोक शेतात नांगरणीसाठी उतरत होते आणि रात्रभर नांगरणी केली जात होती. 

एकोप्याच्या शेतीतून नवउमेद 
आता बैल जोड्या उपलब्ध होत नसल्याने यांत्रिकीकरणाची कास धरली गेली. काही क्षणात होणाऱ्या नांगरणीमुळे रात्री नांगरणीसाठी होणारी धावपळ कमी झाल्याचे ग्रामस्थ चंदू सावंत यांनी सांगितले. शेती परवडत नसल्याच्या भावनेतून काही ठिकाणी शेतकरी शेती करणे सोडत असल्याने पडीक क्षेत्रात वाढ होत आहे; मात्र क्रित्येक वर्ष पिढ्यांनपिढ्या देवाच्या साक्षीने वायंगणी येथे एकोप्याने केली जाणारी सुमारे 250 एकरवरील भात शेती शेतकऱ्यांना नवउमेद देणारी ठरत आहे. 

संपादन - राहुल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com