सिंधुदुर्ग जिल्हाबाहेरून येणाऱ्यांना "आरटीपीसीआर' 

collector press conference konkan sindhudurg
collector press conference konkan sindhudurg

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. यापुढे होणारे प्रत्येक सण घरातच थांबून अत्यंत साधेपणाने साजरे करावेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशाचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाल्या, ""राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सिंधुदुर्गातही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी कोरोना प्रतिबंधासाठी काही कडक निर्बंध घातले आहेत. त्या नियमांचे आणि कडक निर्बंधाचे पालन करावे ही प्रत्येकाची जबाबदारी राहील. जिल्ह्यात आज रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. एकाच दिवशी 117 रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता प्रत्येकाने काळजी घ्यावी. शासनाचे आदेश पाळून कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनास सहकार्य करावे.'' 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण प्रमाण 10 टक्के आहे. एका दिवसात 950 एवढ्या टेस्ट घेतल्या जातात. जिल्हा रुग्णालयात 287 बेड उपलब्ध केले असून सर्व तालुक्‍यात मिळून 653 एवढे बेड उपलब्ध आहेत. प्रत्येक रुग्णाला जेवण व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. होम क्वारंटाईन रुग्णांना रोज फोनवर संपर्क करून व प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपूस केली जात आहे. टेस्ट जलदरित्या व्हावी, यासाठी आणखी एक मशीन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील व्यापारी, मंगल कार्यालयातील कामगार, केटरिंग व्यवसायातील कामगार, हॉटेल व्यावसायिकांनी जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन टेस्ट करून घ्यावी. उपलब्ध यंत्रणेचा 100 टक्के वापर करून जास्तीत जास्त टेस्ट केल्या जात आहेत. कोरोना परिस्थिती पाहता खासगी रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 
मुख्य सचिवांच्या आदेशानुसार, सोमवार ते शुक्रवार अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने व जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने खुली राहतील. अन्य दुकाने बंद राहातील. शनिवार, रविवार अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने वगळता कडकडीत बंद राहील; मात्र रुग्णांसाठी ऑटो रिक्षा व प्रवासी वाहतूक अविरत सुरू राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

पोलिस यंत्रणेची करडी नजर 
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने घातलेले निर्बंध आणि नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क राहील; मात्र कोणताही अतिरेक न करता जनतेला विनंती केली जाईल. त्याला जनतेने सहकार्य करावे नपेक्षा कारवाईचा बडगा उगारावा लागेल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी स्पष्ट केले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com