शासनाच्या निकषांमुळे गोची; हानी लाखाची, भरपाई सहाच हजार 

रूपेश हिराप
Saturday, 15 August 2020

शासनाकडून महसूल कर्मचाऱ्यांनी या नुकसानीचा पंचनामा केला खरा; मात्र शासनाच्या या निकषात बसवताना ही भरपाई कवडीमोल होत आहे. 

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - नुकसान लाखाचं; पण भरपाई मात्र सहाच हजार, अशी शासकीय नुकसान भरपाईची स्थिती आहे. शासनाच्या निकषांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. यात गेली कित्येक वर्षे सर्वसामान्य जनता भरडून निघत आहे. त्यामुळे चक्रीवादळ तसेच पावसात घराचे तसेच इतर स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान होऊनही संबंधित नुकसानग्रस्तांना कर्जबाजारी होऊन निवाऱ्याची दुरुस्ती करणे भाग पडत आहे. 

वाचा - रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीत 69.63 कोटींचा आराखडा सादर

आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या घराचे, इमारतीचे, इतर स्थावर मालमत्तेची पडझड होऊन मोठे नुकसान झाले. महसूलचे कर्मचारी नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवत पंचनामा करून गेले; मात्र भरपाईचे विचारले असता फक्त सहा हजारच मिळणार असे उत्तर त्यांच्याकडून मिळत आहे. काहींच्या घरांचे हजारोच्या पटीत नुकसान होऊनही मिळणाऱ्या भरपाईचा आकडा ऐकून त्यांना धक्काच बसला.

राहत्या निवाऱ्याचे मोठे नुकसान होऊनही देण्यात येणारी नुकसान भरपाईही म्हणजे शासन गरीबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याची प्रतिक्रियाही त्यांच्या तोंडातून ऐकायला मिळाली. शासनाच्या जाचक नियमामुळे ही स्थिती ओढवत आहे. भरपाईबरोबरच पावसाळ्यात एखाद्याचे घर असल्यास व त्यावेळी आवश्‍यक पावसाची नोंद न झाल्यास त्या नुकसानग्रस्त घरमालकास एक रुपयाचीही भरपाई मिळत नाही.

त्यामुळे अनेकांवर कर्जबाजारी तसेच बेघर होण्याची पाळी शासनाच्या अशा या नियमामुळे आली आहेत. सावंतवाडी तालुक्‍यामध्ये 3 ते 8 ऑगस्ट दरम्यान एकूण 14 गावांमध्ये 31 घरांचे तर 2 मांगराचे मिळून सुमारे दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. शासनाकडून महसूल कर्मचाऱ्यांनी या नुकसानीचा पंचनामा केला खरा; मात्र शासनाच्या या निकषात बसवताना ही भरपाई कवडीमोल होत आहे. 

हेही वाचा - सिंधुदुर्गातील  या  कर्तव्यदक्ष  पोलिस निरीक्षकास राष्ट्रपती पदक 

एखाद्या वेळेस शासनाकडून मोठे चक्रीवादळ झाल्यात किंवा निसर्ग वादळाच्या धर्तीवर नुकसान झाल्यास त्या नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात येते; मात्र छोट्या-मोठ्या वादळामध्ये नुकसान झालेल्यांना मात्र शासन नियम लागू केला जातो. त्यामुळे सर्वांना समान न्याय का नाही? अशा सवाल सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहेत. आठ दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामध्ये सर्वसामान्य जनतेच्या घरांची मोठी नुकसानी झाली आहे; मात्र याठिकाणी शासन नियम लागू करण्यात आल्याने अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे खरोखरच ज्यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, त्यांना योग्य ती भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून येथील आमदार-खासदार तसेच पालकमंत्र्यांचा जवळ केली जात आहे. 

गेली कित्येक वर्ष शासनाच्या नियमानुसारच घराच्या पडझडीबाबत नुकसान भरपाई देण्यात येते. यामध्ये अंशत: नुकसान झाल्यास सहा हजार रूपयेच भरपाई मिळते; मात्र एखाद्याचे पुर्णतः घरच जमिनदोस्त झाल्यास संबंधितास सव्वा लाख रूपयाची भरपाई मिळते. 
- प्रदिप पवार, नायब तहसिलदार, सावंतवाडी. 
घराचे सिंमेट पत्रे वादळी वाऱ्यात उडाले तर छप्परच कमकुवत झाल्याने ते पुन्हा दुरूस्त करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे माझे एकुण नुकसान पाहता तीस हजारच्या आसपास आहे; परंतु महसुलकडून पंचनामा करताना शासनाच्या निकषाप्रमाणे सहा हजारच मिळणार असे सांगण्यात आले. त्यामुळे दुरूस्तीसाठी होणारा खर्च उचलायचा कसा हा प्रश्‍न आहे. 
- सुहासिनी अणावकर, सोनुर्ली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: compensation issues konkan sindhudurg