esakal | मोबाईल चोरीचा तक्रारदारच निघाला दुचाकी चोर 
sakal

बोलून बातमी शोधा

Complainant of mobile theft is a two-wheeler thief

यावेळी पोलिसांना आढळले की दिनेश चोरीची तक्रार देण्यासाठी आला होता. यावर अधिक तपास केला असता मिरज येथून एक दुचाकी चोरून आणल्याचे दोघांनी कबूल केले. या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने त्यांनी ती आसूद येथेच सोडून दिली होती.

मोबाईल चोरीचा तक्रारदारच निघाला दुचाकी चोर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी ) -  दापोली पोलीसात मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी आलेली व्यक्तीच दुचाकी चोरीतील आरोपी आढळली. दापोली पोलिसांनी या व्यक्तीकडे असलेल्या गाडीच्या चासी क्रमांकावरून त्या गाडीच्या मालकाचा पत्ता शोधला, पण दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सांगली येथील पोलीसात नोंदविली असल्याचे मालकाने सांगितले. 

दापोली पोलीसात एक व्यक्ती माझा मोबाईल चोरीला गेला आहे, अशी तक्रार घेऊन आला होता. मात्र त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते, त्याला मोबाईलबद्दल कोणतीच माहिती देता आली नाही. त्यामुळे ती व्यक्ती पोलीस ठाण्यातून निघून गेली. त्यानंतर मुरुड समुद्रकिनाऱ्यावर रात्री गस्त घालत असलेल्या दापोली पोलिसांना दिनेश गणपती पाटील (रा. बेळगाव) व सोहेब मुल्ला (रा. काळकाई कोंड दापोली) हे आढळून आले, दापोली पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

यावेळी पोलिसांना आढळले की दिनेश चोरीची तक्रार देण्यासाठी आला होता. यावर अधिक तपास केला असता मिरज येथून एक दुचाकी चोरून आणल्याचे दोघांनी कबूल केले. या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने त्यांनी ती आसूद येथेच सोडून दिली होती. या दुचाकीच्या दोन्ही नंबर प्लेट काढून टाकण्यात आल्या होत्या.

या गाडीच्या चासी क्रमांकावरून त्या गाडीच्या मालकापर्यंत दापोली पोलीस पोहोचले. या दुचाकीचा मालक दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) असल्याचे आढळले. ते दुचाकी (क्रमांक एमएच.07.एएल.0378) घेऊन 19 ऑक्‍टोबर रोजी मिरज बसस्थानक येथे गेले होते. तेथे दुचाकी स्टॅंडमध्ये गाडी ठेऊन ते एसटीने लातूर येथे गेले. लातूर येथून 25 ऑक्‍टोबर रोजी ते परतले. त्यावेळी दुचाकी स्टॅंडवर आढळली नाही. म्हणून त्यांनी सांगली येथील महात्मा गांधी मार्केट पोलीस चौकीत दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली.

पोलिसांनी मिरज बसस्थानकातील सीसी टीव्ही फुटेज तपासले असता ही दुचाकी दोन जण नेत असल्याचे दिसून आले. दापोली पोलीस या दुचाकीच्या मालकपर्यंत पोचल्यावर त्याने आपण दुचाकी चोरीची तक्रार सांगली येथे दाखल केली असल्याचे दापोली पोलिसांना सांगितले. दापोली पोलिसांनी ही माहिती सांगली पोलिसांना दिल्यावर सांगली पोलीस दापोलीत दाखल झाले व त्यांचेकडे या दोन संशयित व दुचाकी दापोली पोलिसांनी स्वाधीन केले.