पर्ससीननेटधारकांना चिंता, हंगाम मंगळवाऱपासून; पण खलाशी गावाकडेच

०
Updated on

रत्नागिरी  : ट्रॉलिंग, गिलनेटपाठोपाठ एक सप्टेंबरपासून पर्ससिननेटद्वारे मासेमारीला सुरवात होणार आहे. कोविडमुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा परिणाम खलाशांच्या आगमनावर होणार आहे. परिणामी काही पर्ससिननेटधारकांना खलाशांअभावी नौका बंदरात उभ्या ठेवण्याची वेळ येणार आहे. 

डॉ. सोमवंशी समितीच्या शिफारशीनुसार 5 फेब्रुवारी 2016 ला पर्ससिन, रिंगसीन (मिनी पर्ससिन) मासेमारीवर प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्ससिन परवानाधारक नौकांवर निर्बंध घालण्यात आले होते. 500 मीटर लांब, 40 मीटर उंची, 25 मिलीमीटरपेक्षा कमी नसलेल्या आसाच्या पर्ससिन जाळ्याने मासेमारी करण्यासाठी 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा कालावधी निश्‍चित करून दिला आहे. शासनाच्या आदेशानुसार, 1 सप्टेंबरपासून पर्ससिननेट मच्छीमारीला सुरवात होणार आहे. मागील हंगामात अखेरच्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे गणित कोलमडले होते. काही काळ मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्याचा आर्थिक भूर्दंड मच्छीमारांना बसला होता. यंदा सुरवातीलाच खलाशांना आणण्यासाठी ई-पास काढण्यापासून त्यांना क्‍वारंटाईन करून ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागत आहेत. काही नौकांनी ठाणे, पालघर येथून खलाशी आणून ठेवले आहेत. कर्नाटक, ओरिसा, बिहार या राज्यांतून येणाऱ्यांसाठी खटपट सुरू आहे. या गडबडीत 25 ते 30 टक्‍केच पर्ससिननेट नौका समुद्रावर स्वार होतील अशी शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात परवानाधारक पर्ससिननेट नौकांची संख्या सुमारे पावणेतीनशे आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्‍यातच या नौका आहेत. कोरोनाच्या सावटाखाली ही मासेमारी सुरू होणार आहे. कर्नाटकबरोबरच नेपाळमधील अनेकजण बोटींवर काम करण्यासाठी गेल्या काही वर्षात कोकणात येत आहेत. कोरोनामुळे नेपाळमधून भारतात येण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अनेक नेपाळी येऊ शकलेले नसल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी अन्य राज्यातील किंवा ठाणे, पालघर येथील लोकांचा पर्याय मच्छीमारांना अवलंबावा लागणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होईल, असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. एका बोटीवर 25 ते 30 खलाशी काम करतात. जिल्ह्यात खलाशी म्हणून काम करण्यासाठी सुमारे 8 ते 9 हजार जण मासेमारी हंगामात येतात. महिन्याचा एका खलाशाचा खर्च किमान दहा हजार रुपये इतका आहे. 

मासेमारी हंगाम सुरू झालेला आहे. त्यानुसार अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी बंदरांवर मत्स्य विभागाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. 
- एन. व्ही. भादुले, सहायक मत्स्य आयुक्‍त 

संपादन : विजय वेदपाठक
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com