काँग्रेस, शिवसेनेसाठी धोक्‍याची घंटा 

नरेश पवार : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पेण - रायगड जिल्हा परिषद, तसेच पेण पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना युतीचे झालेले पानिपत हे दोन्ही पक्षांच्या नेत्यांसाठी धोक्‍याची घंटा ठरली आहे. कार्यकर्त्यांना गृहीत धरून केलेली युती कार्यकर्त्यांनी व मतदारांनीच फेटाळून लावल्याने आगामी वाटचालीत दोन्ही पक्षांची कसोटी लागणार आहे.

पेण - रायगड जिल्हा परिषद, तसेच पेण पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना युतीचे झालेले पानिपत हे दोन्ही पक्षांच्या नेत्यांसाठी धोक्‍याची घंटा ठरली आहे. कार्यकर्त्यांना गृहीत धरून केलेली युती कार्यकर्त्यांनी व मतदारांनीच फेटाळून लावल्याने आगामी वाटचालीत दोन्ही पक्षांची कसोटी लागणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेमधून शेकाप-राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी; तसेच पेण तालुक्‍यात शेकापला रोखण्यासाठी केंद्रीयमंत्री अनंत गीते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी शिवसेना-काँग्रेस युतीची मोट बांधली. ऐन निवडणुकीच्या वेळेत बांधलेली ही मोट कार्यकर्त्यांना बांधून ठेऊ शकली नाही. मागील विधानसभा निवडणुकीत पेण तालुक्‍यातून शिवसेना उमेदवार किशोर जैन यांना मिळालेली मते व काँग्रेस उमेदवार रवीशेठ पाटील यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीपेक्षा जास्त होती. त्यामुळे आपला विजय निश्‍चित असल्याचा आत्मविश्वास दोन्ही पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना होता. हा अतिआत्मविश्वास पराभवाला कारणीभूत ठरल्याचे निकालावरून दिसून येते.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला ‘दादर’ राखण्यातही काँग्रेस नेत्यांना अपयश आले. ते पक्षाच्या चांगलेच जिव्हारी लागणारे आहे. काही वर्षांपासून शेकापने या मतदारसंघाची केलेली पद्धतशीर बांधणी प्रमोद पाटील यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. जिल्हापरिषद, पंचायत समितीद्वारे केलेली विकास कामे, तरुण कार्यकर्त्यांची उभारलेली फळी, रवीशेठ पाटील यांच्या रावे गावात मारलेली मुसंडी यामुळे शेकापची नौका विजयाच्या तीराला लागली. काँग्रेस नेत्यांनी मतदारांना गृहीत धरून केलेले दुर्लक्ष, शिवसेनेच्या मतदारांवर ठेवलेला विश्वास, शेकापचे प्राबल्य असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेले अपयशही काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरले.

जीते मतदारसंघात शेकापचे मात्तबर उमेदवार दि. बी. पाटील यांच्यासमोर पूर्वाश्रमीच्या शेकापचे असलेले जगदीश ठाकूर यांनी शिवसेनेतर्फे कडवी झुंज दिली खरी; मात्र ती अपयशी ठरली. पाटील यांची मतदारांशी असलेली जवळीक, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला, तरी त्याच्या मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती व निष्ठावंत कार्यकर्ते यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे.

खारेपाट विभागातील पाणी प्रश्नावरून शिर्की, भाल व इतर गावांतील ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार शिवसेनेला महागात पडला असल्याचे मानले जात आहे. येथे शेकापचे उत्तम टीमवर्क प्रभाकर म्हात्रे यांना विजयी करून गेले.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या काराव मतदारसंघातून शेकापने ज्येष्ठ नेते महादेव दिवेकर यांना रणांगणात उतरवले होते. काँग्रेसने परशुराम पवार या नवख्या उमेदवाराला तिकीट दिली होती. दिवेकर यांनी पेण पंचायत समितीचे उपसभापती, सभापती, तसेच रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती म्हणून केलेले काम त्यांना उपयोगी पडले. मनमिळाऊ वृत्ती, सर्वच पक्षाच्या नेत्यांजवळ असलेले सलोख्याचे संबंध, दीर्घकाळ असलेली राजकीय पार्श्वभूमी यामुळे मतदारसंघ नवीन असला तरी दिवेकर यांनी विजयश्री खेचून आणली. पाबळ मतदारसंघात शेकापच्या नीलिमा पाटील किती मतांची आघाडी घेतात, याकडेच राजकीय जाणकारांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी सहा हजार ३४८ मतांची आघाडी घेतली.

जिल्हा परिषदेच्या पाचही जागांसह पेण पंचायत समितीच्या सात जागांवर विजय मिळवत शेकापने पेण तालुक्‍यावरील आपली पकड आणखी मजबूत केली आहे. काँग्रेस-शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. 

गाफीलपणा भोवला 
केंद्रीयमंत्री अनंत गीते यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे अविनाश म्हात्रे यांचा वडखळ मतदारसंघातून विजय निश्‍चित मानला जात होता. त्यांच्या विजयासाठी गीते यांनी वडखळ व बोरी येथे जाहीरसभाही घेतल्या. शेकापचे नवखे उमेदवार असलेले प्रभाकर म्हात्रे, माजी सभापती संजय जांभळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन म्हात्रे अशी चौरंगी लढत या मतदारसंघात होती. शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांना मानणारा मोठा मतदारवर्ग असल्याने अविनाश म्हात्रे यांचा विजय निश्‍चित मानला जात होता; मात्र येथेही युतीचा गाफीलपणा पराभूत होण्यास कारणीभूत ठरला.

Web Title: congress shivsena