काँग्रेस ते शिवसेना व्हाया जनता पक्ष 

संदेश सप्रे
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

देवरूख - पूर्वीच्या संगमेश्‍वर नंतरच्या संगमेश्‍वर - लांजा आणि आत्ताच्या चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघाला मोठा इतिहास आहे. 1962 पासून आजपर्यंत या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास या मतदारसंघाची वाटचाल काँग्रेस ते शिवसेना व्हाया जनता पक्ष अशी झाली आहे. 

देवरूख - पूर्वीच्या संगमेश्‍वर नंतरच्या संगमेश्‍वर - लांजा आणि आत्ताच्या चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघाला मोठा इतिहास आहे. 1962 पासून आजपर्यंत या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास या मतदारसंघाची वाटचाल काँग्रेस ते शिवसेना व्हाया जनता पक्ष अशी झाली आहे. 

1962 मध्ये हा मतदारसंघ माखजन नावाने परिचित होता. त्यावेळी पहिल्याच निवडणुकीत या मतदारसंघातून कॉंग्रेसचे विठ्ठल लक्ष्मण रिळकर विजयी झाले. त्यांनी जनसंघाचे शांताराम केनवडेकर यांचा पराभव केला होता. 1967 ला मतदारसंघाचे नामकरण संगमेश्‍वर झाले. त्यावेळी या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या मामी भुवड आमदार झाल्या. त्यांनी जनसंघाच्या श्रीकृष्ण भिडेंचा पराभव केला.

1972 च्या निवडणुकीत मामींनी सलग दुसऱ्यांदा भिडेंचा पराभव करत आमदार होण्याचा मान मिळवला. 1978 ला मतदारसंघावर जनता पक्षाचे राज्य आले. जगन्नाथराव जाधव आमदार झाले. 1980 च्या निवडणुकीत जाधवांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभेत जाण्याचा मान मिळवला. 1985ला या मतदारसंघावर पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आली. कॉंग्रेसचे मुसा मोडक संगमेश्‍वरचे आमदार झाले.

1990 ला काँग्रेस आणि जनता पक्षाची दादागिरी मोडत शिवसेनेने येथे मुसंडी मारली. त्यावेळी शिवसेनेचे रवींद्र माने इथले पहिले तरुण आमदार झाले. त्यानंतर 1995, 1999 ला तेच आमदार होते. 2004 ला मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडेच राहिला. त्यावेळी सुभाष बने आमदार झाले. 2006 च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून सुभाष बने आमदार झाले आणि तब्बल 21 वर्षांनी संगमेश्‍वरला कॉंग्रेसचा आमदार मिळाला.

2009 ला विभाजनात हा मतदारसंघ संगमेश्‍वर-चिपळूण असा केला. त्याआधी 1995 पासून हा मतदारसंघ संगमेश्‍वर-लांजा असा अस्तित्वात होता. 2009 ला शिवसेनेने सदानंद चव्हाण यांच्या रूपाने पुन्हा एकदा मतदारसंघ काबिज केला त्यानंतर 2014 च्या निवडणुकीतही सदानंद चव्हाणच विजयी झाले. 
1990 नंतर या मतदारसंघात कुणाचीही डाळ शिजलेली नाही. आजपर्यंत या मतदारसंघात पाचवेळा कॉंग्रेसचे आमदार झाले. जनता पक्षाला दोनदा संधी मिळाली तर शिवसेनेने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करीत सहा वेळा मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस ते शिवसेना व्हाया जनता पक्ष असा या मतदारसंघाचा इतिहास आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress to Shivsena Via Janata party in Sangmeshwar