कोथळीगडावरील तोफेचे सह्याद्री प्रतिष्ठानकडून संवर्धन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

रायगड - कर्जत तालुक्यामधील कोथळीगडावर एक ब्रिटीशकालीन तोफ सापडली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे सापडलेली ही तोफ बाहेर काढून तिला प्रवेशद्वारजवळ सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

रायगड - कर्जत तालुक्यामधील कोथळीगडावर एक ब्रिटीशकालीन तोफ सापडली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांमुळे सापडलेली ही तोफ बाहेर काढून तिला प्रवेशद्वारजवळ सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाचे अध्यक्ष सुधीर साळोखे आणि सदस्य गणेश बोराडे हे आठवडाभरापूर्वी किल्ल्याच्या नियमित पाहणीसाठी कोथळीगडावर गेले होते. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना, पूर्वजांनी दिलेल्या माहितीनुसार गडावरील दोन तोफा व्यतिरिक्त आणखी एक तोफ होती अशी माहिती दिली. मात्र ही तोफ नक्की कुठे होती याबद्दलची माहिती गावकऱ्यांना सांगता आली नाही. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थेच्या सदस्यांनी किल्ल्याच्या परिसरामध्ये तोफेचा शोध घेतला. या शोधमोहिमेमध्ये गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या १०० फूट खोल अंतरावर एका भल्या मोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली साडेचार फुट लांबीची तोफ सापडली. 

सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तोफ बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले. दोरखंडाच्या साह्याने १०० फूट खोलीवर असलेली ही तोफ बाहेर काढून प्रवेशद्वाराजवळ सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली. जवळपास ५ तास चाललेल्या या मोहिमेमध्ये संस्थेच्या ६० सदस्यांनी श्रमदान केले.

पुरातत्व विभागाने या कामाबद्दल आभार व्यक्त केले आहे. या किल्याची दुर्ग अवशेषात नोंद व्हावी म्हणून पुरातत्व विभागाला पत्राद्वारे तोफेचे मोजमाप आणि माहिती दिली जाणार आहे. लवकरच या तोफेला तिचे पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागामार्फत तोफगाडा बसविण्यात येणार आहे. 

-  गणेश रघुवीर,

अध्यक्ष, दुर्ग संवर्धन विभाग, सह्याद्री प्रतिष्ठान 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conservation of cannon on Kothligad by Sahyadri Pratishthan

टॅग्स