सिंधुदुर्ग : कासमध्ये दसरोत्सवावरून वाद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

बांदा - देवीची तरंगकाठी व कळस फिरवण्याच्या मानपानावरून कास येथील पंडीत व भाईप यांच्यातील देवस्थानचा असलेला वाद दसरोत्सवात पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सावंतवाडी तहसीलदारांनी विजयादशमी दिवशी गावात लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून पंडीत गटाने दसरोत्सव साजरा केल्याची फिर्याद मडूरा महसुल मंडळ अधिकारी अशोक यशवंत पवार यांनी बांदा पोलीसांत दिली आहे.

बांदा - देवीची तरंगकाठी व कळस फिरवण्याच्या मानपानावरून कास येथील पंडीत व भाईप यांच्यातील देवस्थानचा असलेला वाद दसरोत्सवात पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सावंतवाडी तहसीलदारांनी विजयादशमी दिवशी गावात लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून पंडीत गटाने दसरोत्सव साजरा केल्याची फिर्याद मडूरा महसुल मंडळ अधिकारी अशोक यशवंत पवार यांनी बांदा पोलीसांत दिली आहे. त्यावरून बांदा पोलीसांत 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बांदा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, कास येथील श्री देवी माऊली व देव रवळनाथ देवस्थानातील तरंगकाठी व कळस फिरविण्यावरून पंडीत व भाईप यांच्यात मानपानावरुन गेली काही वर्षे वाद सुरू आहेत. मागील शिमगोत्सवात हा वाद समोर आला होता. त्या अनुषंगाने भाईप गटाने दिलेल्या अर्जानुसार सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात 27 सप्टेंबरला सुनावणी झाली. यावेळी दसरोत्सव साजरा करण्यात एकमत झाले; मात्र श्री देवी माऊली मंदिर, रवळनाथ मंदिर व गावात कळस फिरविणे या एका मुद्‌द्‌यावर वाद असल्याचे दिसून आले.

त्यानुसार 29 सप्टेंबर ते 8 ऑक्‍टोबर दरम्यान भाईप व पंडीत गटाने गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून दसरोत्सव साजरा करण्याचे आदेश सावंतवाडी तहसिलदारांनी दिले होते.
तरंगकाठी व कळस फिरविण्यास मनाई आदेश दिला होता; मात्र पंडीत गटाने मनाई आदेश धुडकावत तरंगकाठी फिरविल्याचा भाईप गटाचा आरोप होता. याबाबतची फिर्याद मडूरा महसुल मंडळ अधिकारी अशोक पवार यांनी बांदा पोलीसांत दिली आहे.

फिर्यादीनुसार तहसीलदारांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंडीत गटाच्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली आहे. त्यात राजाराम दत्ताराम पंडीत, विश्‍वनाथ सखाराम पंडीत, कृष्णा महादेव पंडीत, मनोहर हरी पंडीत, घनश्‍याम राजाराम पंडीत, विठ्ठल जनार्दन पंडीत, विश्वास भास्कर पंडीत, नकुळ रामचंद्र पंडीत, सुरेश माम पंडीत, सुभाष शांताराम पंडीत, बाबली शिवराम पंडीत, विजय रामकृष्ण पंडीत, वसंत गोविंद पंडीत व सत्यवान बलराम पंडीत यांचा समावेश आहे. चार दिवसांत सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

प्रशासनावर आरोप
प्रशासन नेहमीच गावात दुटप्पी धोरण राबवित असल्याने गावात वाद निर्माण होत आहेत. देवस्थानातील वादाची पूर्ण कल्पना प्रशासनाला आहे. असे असतानाही उत्सवावेळी अटी-शर्थी लादून बंदी आदेश देण्यात येतो. त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात. सरसकट बंदी आदेश द्यावेत, अन्यथा बंदी उठवावी; मात्र प्रशासन दुटप्पी व दबावाखाली वागत असल्याने गावात वाद निर्माण होत असल्याचा आरोप भाईप ग्रामस्थांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The controversy over the Dasara festival in Kas Sindhudurg