महाराष्ट्रातील 'हा' तालुका गोव्यात विलिन करण्यावरून वादंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

दोडामार्ग गोवा सीमेवरचा तालुका असल्याने अनेक युवक गोव्यात नोकरीला जातात. तालुक्‍याला आरोग्यसेवेसाठी गोव्यावर अवलंबून राहावे लागते. शिवाय गोव्याच्या तुलनेत तालुक्‍यातील रस्त्यांची दुरवस्था आहे. साहजिकच त्यावरील तीव्र प्रतिक्रिया म्हणून अनेकांनी तालुकाच गोव्याला जोडला जावा, असा मुद्दा मांडला.

दोडामार्ग - तालुक्‍याला गोवा सरकारने आपल्या राज्यात विलीन करुन घ्यावे म्हणून सोशल मिडियावर चळवळ सुरु करणाऱ्या युवकांच्या पहिल्याच बैठकीत विलिनीकरण समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडल्याने रविवारी (ता.3) येथील सिद्धिविनायक मंदिरात झालेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. हमरीतुमरी झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करुन सभा चालविण्यास मज्जाव केला.

दोडामार्ग गोवा सीमेवरचा तालुका असल्याने अनेक युवक गोव्यात नोकरीला जातात. तालुक्‍याला आरोग्यसेवेसाठी गोव्यावर अवलंबून राहावे लागते. शिवाय गोव्याच्या तुलनेत तालुक्‍यातील रस्त्यांची दुरवस्था आहे. साहजिकच त्यावरील तीव्र प्रतिक्रिया म्हणून अनेकांनी तालुकाच गोव्याला जोडला जावा, असा मुद्दा मांडला. त्यातून त्या मुद्‌द्‌याचे समर्थन करणाऱ्यांची बैठक मंदिरात होती. बैठकीला समर्थक, विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील भाजप शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

विलिनीकरणाचा मुद्दा मांडताना काहींनी सत्ताधारी आमदार व खासदार यांच्यावर टीका केली. तालुका निर्माण होवून वीस वर्षे झाली तरी ते विकास करु शकले नाहीत, असा मुद्दा मांडताच त्याला शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी आक्षेप घेतला. तालुका विकसनशील आहे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अनेक विकासकामे केलीत, अनेक कामांसाठी निधी दिला आहे. लवकरच ती कामे सुरु होतील.

रोजगार, रुग्णालय यांसाठी प्रयत्न सुरु आहेत. वाटल्यास मी त्यांना बोलावतो, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा; पण राजकीय हेतूने त्यांना टार्गेट करु नका. अखंड महाराष्ट्रासाठी 105 जणांनी बलिदान दिले ते वाया जाता नये. आपण विकासाच्या मुद्‌द्‌यावर लढा उभा करु असे सांगितले. उपस्थित तरुणांनी खासदार आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा झाल्यावर पुढची दिशा ठरवू, असे सांगितले. उपसभापती लक्ष्मण नाईक यांनी युवकांच्या भावनांचे समर्थन केले; पण महाराष्ट्रातील एक इंचही जागा गोव्यात जाता नये, असा मुद्दाही मांडला.

दरम्यान एका मुद्‌द्‌यावरून श्री. धुरी आणि बैठकीचे निमंत्रक यांच्यात खडाजंगी झाली. दुसरीकडे मणेरी विभागप्रमुख सज्जन धाऊसकर आणि कोनाळ सरपंच पराशर सावंत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करुन सर्वांना मंदिरातून जाण्यास सांगितले आणि तणाव निवळला. तालुका विलिनीकरणासाठी घेतलेल्या पहिल्याच बैठकीला मात्र वादंगाचे गालबोट लागले.

विकासासाठी गोव्यात समावेशाची बाजू योग्यच

तालुक्‍याच्या विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे. शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा आणि आरोग्यसुविधा यात तालुका मागे आहे. महाराष्ट्र शासन त्याबाबत गंभीर नसल्याने तालुक्‍याचे गोव्यात विलिनीकरण व्हावे, अशी भूमिका मांडणे नक्कीच अयोग्य नाही असे मत युवा कार्यकर्ता रामचंद्र ठाकूर यांनी मांडले.

गोव्याचा कुटील कावा ओळखा 

दोडामार्ग तालुका निसर्गसंपन्न आहे. गावागावात खनिज साठे आहेत. गोव्याप्रमाणे दोडामार्गमध्ये पर्यटन आणि खनिज उद्योग उभारुन इथली साधनसंपत्ती गोव्याला ओरबाडून न्यायची आहे आणि त्यासाठी काही माणसांना तालुक्‍यात पेरून ते इथल्या तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा डाव आम्ही महाराष्ट्रप्रेमी म्हणून उधळून लावू, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य बाबूराव धुरी यांनी मांडली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversy Over The Issue of Connecting Dodamarg To Goa