डॉ. सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा पदवीदान लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 May 2019

एक नजर

  • दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा न्यायलयाचा निकाल.
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नागपूर येथील काही विद्यार्थ्यांची याचिका. 
  • १८ मे रोजी आयोजित केलेला पदवीदान समारंभ ढकलला पुढे.

 

दाभोळ - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर येथील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १८ मे रोजी आयोजित केलेला पदवीदान समारंभ पुढे ढकलला आहे. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ३८ व्या पदवीदान समारंभाचे १८ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र २४ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा मत्स्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी देण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे. मत्स्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी कशी द्यायची असा प्रश्‍न विद्यापीठ प्रशासनाला पडला आहे.

विद्यापीठातील इतर विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना पदवी द्यायची व फक्‍त मत्स्य विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी द्यायची नाही यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रमावस्था निर्माण होईल. यामुळे वादाला आणखी तोंड फुटेल. यामुळे हा पदवीदान समारंभ ‘काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. पदवीदान समारंभाची सुधारित तारीख विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल’, असे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Convocation of Dr Balasaheb Sawant Konkan Agriculture university postponed