esakal | शिक्षकांना आता कोरोना ड्युटी

बोलून बातमी शोधा

corona duty teacher konkan sindhudurg

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. शिवाय परजिल्ह्यातून आणि परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर तपासणी प्रमाणपत्र सोबत असणे आवश्‍यक केले आहे.

शिक्षकांना आता कोरोना ड्युटी
sakal_logo
By
नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला मनुष्यबळाची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानक आणि 6 चेक पोस्टवर 88 प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्‍त्या केल्या जाणार आहेत. याबाबत आरोग्य विभागाने या शिक्षकांची शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे. 

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. शिवाय परजिल्ह्यातून आणि परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर तपासणी प्रमाणपत्र सोबत असणे आवश्‍यक केले आहे. ते नसल्यास त्वरित तपासणी करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत; मात्र सद्यास्थिती जिल्ह्यात आढळत असलेले रुग्ण, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लागणारे कर्मचारी, लसीकरण साठी कर्मचारी नियुक्त केल्याने आणि अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.

परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवताना ही अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ज्याठिकाणावरून परजिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात दाखल होतात, असे चेकपोस्ट, रेल्वे स्थानके आदी ठिकाणी दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवण्यासाठी आणि त्यांनी आरटीपीसीआर तपासणी केली की नाही याची खातरजमा करण्यासाठी आरोग्य विभागाला कर्मचारी वर्गाची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना कालावधीत रेल्वे स्थानक आणि चेकपोस्ट येथे नोंदी ठेवण्यासाठी शिक्षक मिळावेत, अशी मागणी एका पत्राद्वारे आरोग्य विभागाने शिक्षण विभागाकडे केली आहे. या पत्रानुसार आरोग्य विभागाने 88 शिक्षकांची मागणी केली आहे. 

चेकपोस्टवर नियुक्‍त्या 
वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानक, खारेपाटण, करुळ, फोंडा, पत्रादेवी, सातार्डा, आंबोली या चेकपोस्टवर या शिक्षकांच्या नियुक्‍त्या होणार असून सकाळी 8 ते दुपारी 2 वाजता तर दुपारी 2 ते रात्री 8 वाजता अशा दोन सत्रात 4-4 शिक्षकांच्या नियुक्‍त्या केल्या जाणार आहेत. रेल्वे स्थानक व चेकपोस्ट येथे नागरिकांच्या नोंदी ठेवणे, त्यांच्याकडे आरटीपीसीआर तपासणी प्रमाणपत्र आहे का? याची खात्री करणे, नसल्यास त्यांना तपासणी केंद्रात दाखल करणे ही जबाबदारी देण्यात येणार आहे. 

संपादन - राहुल पाटील