कोकणात या एकशे नऊ गावांच्या दोनशे बत्तीस वाड्यांनी गणेशउत्सवासाठी घेतला हा मोठा निर्णय

सचिन माळी
Friday, 21 August 2020

कुणबी भवनची एकतीस वर्षांची परंपरा खंडित
दीड दिवस गणेशमूर्ती स्थापना; २१ किमीची मिरवणूक रद्द 

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यातील एकशे नऊ गावांच्या दोनशे बत्तीस वाड्या सामाजिक बांधिलकीच्या एका विचाराने जोडण्याऱ्या कुणबी भवन येथील गणेशोत्सव यावर्षी दिडच दिवस होणार आहे. कुणबी सेवा संघाच्या माध्यमातून एकतीस वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून २१ किमी लांब जाणारी विसर्जन मिरवणूक परंपरा बत्तीसाव्या वर्षी मात्र खंडित होणार आहे. कोरोनामुळे कमिटीने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष दिनेश साखरे यांनी सांगितले.

 १९८६ मध्ये कुणबी भवनची निर्मिती झाली. त्याच्या दुसऱ्या वर्षाला समाजनेते व माजी आमदार अॅड.जी.डी.सकपाळ व सुलभाताई सकपाळ या दाम्पत्याच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. बारा दिवसांच्या सार्वजनिक उत्सवात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांची रेलचेल असते. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व धर्मांतील समाजबांधव उपस्थित राहतात.

हेही वाचा- नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले हे मंत्री

तालुक्यातील गावोगावी जतन करून ठेवलेल्या जाखडी, भजन, कीर्तन, हरिपाठ, टिपरी नृत्य अशा विविध पारंपरिक कलांचा ठेवा कुणबी भवन राजासमोर सादर करून समाज प्रबोधन केले जाते. उत्सवाचा खर्च तालुक्यातील समाजबांधव देणगी स्वरूपात उभा करतात. संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय सण, कुणबी भवन वर्धापन दिन, विद्यार्थी गुणगौरव, आर्थिक सहाय्य, समाजहिताची आंदोलने, वैद्यकीय सुविधा, महिला सक्षमीकरण, विविध विषयांवरील मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून बांधिलकी जपली जाते.

हेही वाचा-सिंधुदुर्गात वाजंत्रीशिवाय गणरायाची प्रतिष्ठापना -

तालुक्यातील हजारोंचा जनसमुदाय जोडला असून उत्सवाला कुणबी भवनचा राजा अशी बिरुदावली प्राप्त झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लॉक डाऊन आणि सण साजरे करण्याचे नियम व होणारी गर्दी यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मूर्तीची उंचीही कमी करण्यात आली असून  २३ ऑगस्ट रोजी शहराजवळून वाहणाऱ्या निवळी नदीत विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी झालेल्या सभेला भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, रघुनाथ पोस्टुरे, विजय ऐनेकर, सुभाष सापटे, योगेश पवार, भिकू बेर्डे, उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona impact One and a half day Ganesh idol installation 21 km procession canceled