Video - पर्यटकांअभावी आंबोली सुनी - सुनी ; अनेक कुटुंबांचे संसार अडचणीत 

corona infection in sawantwadi amboli tourism
corona infection in sawantwadi amboli tourism

आंबोली - वर्षा पर्यटनावर बंदी आल्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. जवळपास सहाशे कुटुंबांना याचा फटका बसला आहे. अनेकांना उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत शोधावे लागत आहेत. त्याचा प्रभाव पुढचे वर्षभर बसणार आहे. 

आंबोली हे सिंधुदुर्गातील एकमेव हिल स्टेशन. ब्रिटिश काळापासून येथे पर्यटनाच्या दृष्टीने पाहिले गेले. बेळगाव ते वेंगुर्ले हा मार्ग ब्रिटिशांनी बनवला. यात आंबोली घाट हा महत्त्वाचा टप्पा होता. या काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांना हिल स्टेशन म्हणून आंबोलीचे महत्त्व लक्षात आले. शिवाय या मार्गावरील हे मध्यवर्ती ठिकाण होते. त्यामुळे ब्रिटिशांनी विश्रांती स्थळ म्हणून आंबोलीचा विकास केला. त्यांनी येथील पर्यटन पॉईंट शोधून काढून तेथे जाणारे मार्ग विकसित केले. त्या ठिकाणी रेस्टहाऊस उभारले. 
पुढच्या टप्प्यात पर्यटनाच्या अनुषंगाने फारशा सुविधा झाल्या नाहीत. नव्वदच्या दशकात सिंधुदुर्गात पर्यटन विकासाचे वारे वाहू लागले. या काळात आंबोलीतही विकास सुरू झाला. हॉटेल्स उभारली गेली; पण याला वर्षा पर्यटनाने खरा आकार दिला.

आंबोली घाटातील धबधबे मुख्य आकर्षण ठरले. त्यातही सगळ्यात मोठा असलेला मुख्य धबधबा लाखोंची गर्दी खेचू लागला. एकूण पर्यटनाच्या उलाढाली वर्षापर्यटनाच्या अवघा महिन्याचा हंगाम मोठा आर्थिक हातभार लावू लागला. 

व्हिडिओ पाहा - 


यंदा याच हंगामाला ब्रेक लागल्याने आंबोलीतील व्यावसायिकांसमोर खूप मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. येथे जवळपास 70 हॉकर्स प्रकारात मोडणारे स्टॉल या हंगामात लागतात. हे सर्व व्यावसायीक स्थानिक आहेत. फार कमी भांडवल गुंतवावे लागत असल्याने आर्थिक क्षमता नसलेलेही यात उतरतात. 

 .

आंबोलीत 70 स्टॉल्स 
स्टॉलमधून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अडीचशे कुटुंबांना रोजगार मिळतो. हा धंदा वर्षा पर्यटनाच्या काळात एकूण वर्षाच्या तुलनेत 90 टक्‍के इतका होतो. आंबोलीत जवळपास 70 हॉटेल्स आहेत. लगतच्या चौकुळमध्ये छोट्या-मोठ्या हॉटेल्सची संख्या 10 ते 12 आहे. यातूनही तीनशेच्या दरम्यान कुटुंबांना रोजगार मिळतो. अनेकांनी हॉटेल व्यावसायासाठी मोठी कर्ज काढली आहेत. वर्षा पर्यटन काळात हे कर्जाचे आर्थिक गणित जुळवले जाते. यंदा यावर मोठा परिणाम झाला आहे. 
 
घर चालवायचे कसे? 
कोरोनामुळे या पर्यटनावर आलेला बंदी काही कोटींची उलाढाल थांबवणारी ठरली आहे. याचा फटका इथल्या पर्यटन चळवळीलाही बसणार आहे. अनेक कुटुंबासमोर घर कसे चालवायचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काहींनी यावर पर्याय शोधायचा प्रयत्न केला. पडीक असलेल्या जमिनीत शेती करणाऱ्यांची संख्या या वेळी वाढली आहे. यात शेतीविषयी आपुलकीपेक्षा अगतिकता जास्त आहे. 
 
भविष्यात वेगळा विचार हवा 
सिंधुदुर्ग हा एकमेव पर्यटन जिल्हा आहे. आंबोली हे एक उदाहरण आहे. जवळपास सगळ्याच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सागरी किनारपट्टीवर उन्हाळ्यातील हंगाम महत्त्वाचा असतो. कोरोनामुळे तोही अडचणीत आला. येथील पर्यटनाच्या चळवळीला ही अनिश्‍चितता कुठेतरी छेद देऊ शकते. त्यामुळे इथल्या पर्यटनासाठी शासनाला भविष्यात वेगळा विचार करावा लागणार आहे. 

यंदाचा वर्षापर्यटन हंगाम अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीत आणणारा ठरला आहे. चौकुळ आणि आंबोली येथील अर्थकारण प्रामुख्याने याच हंगामावर चालते. तो हातचा गेल्यामुळे पुढच्या वर्षभरात आर्थिक घडी बसवणे कठीण होणार आहे. 
- गुलाबराव गावडे, माजी सरपंच, चौकुळ 
 
 
 चौकुळच्या होम स्टे पर्यटनाला जास्त फटका 
 आंबोलीत हॉटेल व्यवसायाचे अर्थकारण अडचणीत 
 सुमारे 600 कुटुंबांसमोर आर्थिक प्रश्‍न 
 स्टॉल चालवणाऱ्यांवर पर्याय शोधण्याची वेळ 

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com