कोरोनाने सिंधुदुर्गात आणखी तिघांचे बळी़; नवे ४० रुग्ण

विनोद दळवी
Thursday, 27 August 2020

जिल्ह्याची कोरोनाबाधित संख्या एक हजार 49 झाली आहे.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने आणखी तिघांचा बळी घेतला. यातील दोघे सावंतवाडी तालुक्‍यातील, तर एक कणकवली तालुक्‍यातील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 19 झाली; तर आणखी 40 रुग्ण मिळाल्याने जिल्ह्याची कोरोनाबाधित संख्या एक हजार 49 झाली आहे. आणखी 13 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 555 झाली. परिणामी, जिल्ह्यात 467 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. 

नवीन वाढलेल्या रुग्णांमध्ये मालवण तालुक्‍यातील 18 रुग्णांचा समावेश आहे. सर्जेकोट, आचरा व देवली गावात प्रत्येकी दोन रुग्ण मिळाले. मालवण शहरातील बांगीवाडा, देऊळवाडा, गवंडीवाडा या भागातील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. भरड आणि रेवतळे येथे आठ रुग्ण मिळाले. यात मालवण शहरातील एका भाजी विक्रेत्या महिलेचा समावेश असल्याने मालवण शहर हादरले. वैभववाडी तालुक्‍यात 11 रुग्ण असून, वैभववाडी शहर पाच, खाबाळे पाच, उबर्डे एक रुग्ण आहे. कणकवली शहरातील एक रुग्ण आहे. कुडाळ तालुक्‍यात तीन रुग्ण मिळाले असून, कसाल, कुडाळ शहर आणि मुळदे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. वेंगुर्ले शहरात चार रुग्ण मिळाले असून, शिरोडा तीन आणि मोचेमाड एक असे रुग्ण आहेत; तर सावंतवाडी शहरात दोन आणि दोडामार्गमध्ये एक रुग्ण मिळाला आहे. 

दरम्यान, सावंतवाडी तालुक्‍यातील मृत्यू झालेल्यांपैकी एक जण शहरातील, तर एक तळवडे येथील आहे. दोघांवर ओरोस येथे कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. दोघांच्या मृत्यूने तालुक्‍यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सातवर पोचली आहे. सालईवाडा भागातील एका 54 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत झालेल्या व्यक्तीचे शहरात भुसारी दुकान होते. त्याचे घर पूर्णतः सील करीत घरातील सर्वांना क्‍वारंटाईन करण्यात आले. तळवडे-म्हाळईवाडी येथील 35 वर्षीय कर्करोग झालेल्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

कणकवली तालुक्‍यातील सांगवे घोसाळवाडी येथील 63 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना आज मुंबईला उपचारांसाठी नेत असताना हा प्रकार घडला. त्यांच्यावर गेले काही दिवस ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. कणकवली तालुक्‍यात कोरोनामुळे यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला होता. यात ओझरम्‌ येथील ज्येष्ठ नागरिक, तर खारेपाटण येथील 17 वर्षीय युवकाचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णाची 15 ऑगस्टला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. 

संपादन ः विजय वेदपाठक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona killed three more at Sindhudurg; 40 new patients