कोरोना स्वयंसेवकांचे तडकाफडकी निर्णय अन् प्रशासनाची डोकेदुखी

पल्लवी सावंत
गुरुवार, 30 जुलै 2020

रविवारी सायंकाळी नांदगाव गावातील स्थानिक मच्छी विक्रेता हा पॉझीटीव्ह सापडल्यानंतर कन्टेन्मेंट झोनबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली.

नांदगाव (सिंधुदुर्ग) - येथील कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शासनाच्या आदेशाने स्थापन झालेल्या कोरोना स्वयंसेवक गाव समितीतील 9 सदस्यांनी आज तडकाफडकी सामुदायिकरित्या राजिनामा दिल्याने खळबळ उडाली असून ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राजिनामा दिल्याने स्थानिक प्रशासनाची डोकेदुकी वाढली आहे. राजिनामा देताना नांदगाव समितीच्या सभेमध्ये जे सर्वानुमते निर्णय होतात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे राजिनामा पत्रात म्हटले आहे. नांदगाव सरपंच तथा समिती अध्यक्ष आफोजा नावलेकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता निश्‍चित कारण समजू शकले नसल्याचे सांगितले. 

स्वयंसेवकांच्यावतीने रविराज मोरजकर म्हणाले, ""नांदगावात कोरोनाच्या पार्श्‍वभमीवर 4 ते 5 महिने निरपेक्षपणे काम केले. प्रत्येकवेळी सभेमध्ये वेळोवेळी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी होत नव्हती. त्यातच रविवारी सायंकाळी नांदगाव गावातील स्थानिक मच्छी विक्रेता हा पॉझीटीव्ह सापडल्यानंतर कन्टेन्मेंट झोनबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली.

कंटेन्मेंन्ट झोनचा परिसर निश्‍चित झाला; पण त्यानंतर 24 तास उलटूनही कार्यवाही दिसत नव्हती. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून पॉझीटीव्ह रूग्ण मिळून बरेच तास उलटूनही कन्टेन्मेंट झोनबाबत कोणतीही हालचाल होत नसेल तर झोन रद्द करावा, असे म्हणणे मांडले; परंतू म्हणण्याबाबत गैरसमज पसरविण्यात आला. जर निरपेक्षेने आणी पर्यायाने स्वत:चा कुटूंबांचा जीव धोक्‍यात घालून काम करूनही असे वाद होत असतील तर या पदावर राहणे योग्य नाही.'' ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर यांना विचारले असता त्यांनी पुढे गणेश चतुर्थी असून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. 

स्वयंसेवक सदस्यांचे जर काही गैरसमज झाले असतील ते दूर करून पुन्हा आजपर्यंत जे सहकार्य केले ते असेच पुढेपर्यंत करावे. 
- निरज मोरये, उपसरपंच, नांदगाव. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona volunteer resign nandgaon sindhudurg district