सावधान...क्वारंटाईन आहात? मग तुम्ही हे वाचाच...

coronavirus impact konkan sindhudurg
coronavirus impact konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील क्वारंटाईन व्यक्तींवर आता पोलिस हायटेक नजर ठेवत आहेत. अशा व्यक्ती घराबाहेर पडल्यास नियंत्रण कक्षाला तातडीने माहिती कळेल, अशी यंत्रणा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी कार्यान्वित केली आहे. 

कोरोनाचा प्रसार समाजातील अन्य व्यक्तींना होऊ नये, यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचे घरातच अलगीकरण करण्यात येते व त्यांच्या शरीरावर तसा शिक्का उमटवण्यात येतो; परंतु घरीच अलगीकरण करण्यात आलेले काही लोक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता समाजात फिरताना आढळतात व सामाजिक स्वास्थ धोक्‍यात आणतात.

अशा व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड-19 क्वारंटाईन मॅनेजमेंट सिस्टिम नावाचे ऍप कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या ऍपमुळे घरीच अलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती घराबाहेर पडल्यास तिचे लोकेशन तत्काळ जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षास कळणार आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या घरी तत्काळ पोलिस पथक पाठवून त्याला योग्य समज देण्यात येईल. 

घरीच अलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती वारंवार घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यास, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास माहिती देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे घरीच अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींनी घराबाहेर न पडता सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक गेडाम यांनी केले आहे. 

आणखी चार कॅम्प वाढविले 
परराज्यांतील मजूर, बेघर तसेच कामगार यांच्यासाठी जिल्ह्यात एकूण 14 कॅम्प उभारण्यात आले असून, त्यात आजमितीस 527 एवढे लोक राहत आहेत. या सर्वांच्या जेवणाची सोय शिवभोजनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मजूर व बेघर कॅम्पसाठी कोणास वस्तू स्वरूपात मदत करावयाची असल्यास त्यांनी विक्रम बहुरे- 9518950903 किंवा अशोक पोळ- 9766144041 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश भंग केल्याबद्दल 35 जणांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण 31 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केलेली आहेत. 

ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन 
ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना शिधा, औषध, आरोग्य या संबंधी काही समस्या असल्यास तसेच काही आवश्‍यकता असल्यास त्यांनी 02362-228869 या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. हा हेल्पलाईन क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे. 

समुपदेशनाची व्यवस्था 
जिल्ह्यात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात येत आहे. मजूर व बेघर कॅम्पमध्ये अडकलेल्या लोकांचेही समुपदेशन करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत सहा समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. समुपदेशनासाठी नमिता परब (7887366603), अर्पिता वाटके (7385250501, दोन्ही सावंतवाडी), समृद्धी मळेकर (9326298748), नम्रता नेवगी (9527911350, दोन्ही कुडाळ); तर रिया सांगेलकर (9420969702), रोजा खडपकर (9765321297, दोन्ही कणकवली) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com