esakal | चिंताजनक! `येथे` काजूची लाखोंची उलाढाल ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus effect  the cashew business

तरुणांनी देखील नोकरीकडे न वळता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन माळरानावर काजू बागायती फुलविल्या आहेत. येथील काजू आकाराने मोठे व चविष्ट असल्याने बाजारात या काजूंना मोठी मागणी असते. 

चिंताजनक! `येथे` काजूची लाखोंची उलाढाल ठप्प

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - कोरोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने याचा फटका येथील काजू बागायतदारांना बसला आहे. वातावरणाचा फटका बसल्याने यावर्षी उशिरा सुरू झालेले उत्पन्न, त्यात माकडतापाची भीती व आता कोरोनामुळे बंद झालेली काजू खरेदी यामुळे स्थानिक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. काजू उत्पन्नावर अवलंबून असलेले येथील अर्थकारण कोरोनामुळे पूर्णपणे कोलमडून गेले आहे. 
जिल्ह्यात काजू उत्पादनासाठी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, बांदा परिसर जिल्ह्यात अग्रेसर आहे. याठिकाणी ग्रामीण भागात 100 टक्के काजूचे उत्पादन घेण्यात येते. तरुणांनी देखील नोकरीकडे न वळता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन माळरानावर काजू बागायती फुलविल्या आहेत. येथील काजू आकाराने मोठे व चविष्ट असल्याने बाजारात या काजूंना मोठी मागणी असते. 

यावर्षी पाऊस लांबल्याने थंडीचे आगमन उशिराने झाले. बदलत्या वातावरणाचा फटका काजू बागायतीला मोठ्या प्रमाणात बसला. जानेवारीत सुरू होणारे काजू उत्पादन तब्बल दोन महिने उशिराने सुरू झाले. बदलत्या वातावरणात 50 टक्केहून अधिक मोहोर जळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हंगामाच्या सुरुवातीलाच बिघडले होते. काजू बागायती साफसफाई करणे, मोहोर टिकविण्यासाठी फवारणी करणे यासाठी झालेला खर्च व मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसत नसल्याने शेतकरी वर्ग आधीच चिंतेत होता. काजू विक्रीचा दर 120 रुपये प्रतिकिलोच्या खाली उतरल्याने भविष्यातील दर वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी काजू विक्री न करता घरातच साठा करून ठेवला आहे. 

काजू खरेदी तूर्त बंद 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात देखील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. खबरदारी घेण्यासाठी शासकीय व खासगी कंपन्या देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून मागणी नसल्याने व्यापाऱ्यांनी काजू खरेदी पूर्णपणे बंद केली आहे. याचा परिणाम स्थानिक शेतकऱ्यांवर झाला आहे. रोजची काजू विक्री करून मिळणाऱ्या पैशांतून ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते; मात्र काजू खरेदीच बंद झाल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. 

लाखोंची उलाढाल ठप्प 
बांदा ही काजू खरेदीची जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सिंधुदुर्ग बरोबरच गोव्यातील काजू विक्रीसाठी बांदा बाजारपेठेत आणण्यात येतो. याठिकाणी काजूवर प्रक्रिया करणारे कारखाने असल्याने शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळतो. दररोज बांद्यात हजारो किलो काजूची खरेदी होते. सोमवारी आठवडा बाजारा दिवशी हाच आकडा दुप्पट होतो. कोरोनामुळे 14 एप्रिलपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने भविष्यात काजू खरेदी होणार की नाही याबाबत साशंकता असल्याने स्थानिक शेतकरी मात्र चिंतेत आहे. हजारो क्‍विंटल काजू हा शेतकऱ्यांच्या घरात व काजू बागायतीत पडून आहे. 

माकडताप अन्‌ आता "कोरोना' 
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यात माकडतापचा प्रादुर्भाव गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी दोन्ही तालुक्‍यातील 8 गावांमध्ये तब्बल 18 माकडतापबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातील दोन रुग्णांचा गेल्या पंधरा दिवसात उपचार सुरू असताना मुत्यु झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन काजू हंगामाच्या तोंडावरच माकडतापाची दहशत निर्माण झाल्याने कित्येक गावात शेतकऱ्यांनी काजू गोळा करणे सोडले आहे. दरम्यानच्या काळात काजू बागेत मृत माकडे सापडल्याने शेतकरी पुरते घाबरून गेले आहेत. 
 

loading image