coronavirus effect on Sangameshwar Shimpane Utsav
coronavirus effect on Sangameshwar Shimpane Utsav

कोकणातील या मोठ्या उत्सवावर कोरोनाचे सावट ; आयोजकांना नोटीसा 

संगमेश्‍वर - संगमेश्‍वरात येत्या रविवारी साजर्‍या होणार्‍या प्रसिध्द शिंपणे उत्सवावर यंदा कोरानाचे सावट आले आहे. संगमेश्‍वर पोलिसांनी यावेळी आयोजक आणि मानकर्‍यांना नोटीस बजावून मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे यावर्षीच्या शिंपण्याचा रंग फिका पडण्याची शक्यता आहे.

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. दिवसागणिक रूग्ण आणि संशयीत वाढत असल्याने राज्य सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, सिनेमागृह, मॉल्स 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय दहावी - बारावी वगळता सर्व परीक्षा आणि आगामी महिन्यात होणार्‍या ग्रामपंचायत तसेच महानगर पालिकांच्या निवडणुकाही 3 महिन्यांसाठी पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील सार्वजनिक रितीने साजरे होणारे सण, उत्सव, यात्रा, उरूस, विवाह सोहळे आदींवर बंधने घालण्यात आली आहेत. तसे आदेश प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांना देऊन ते स्थानिक पातळीवर निर्गमीत करण्यात आले आहेत. 

याच पार्श्‍वभूमीवर संगमेश्‍वरचे पोलिस निरीक्षक यु. जे. झावरे यांनी शिंपणे उत्सवातील मानकरी व आयोजकांना एक नोटीस बजावत कारोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा उत्सव मानकरी, पुजारी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा मात्र यासाठी स्थानिक तहसिलदारांची पुर्वपरवानगी घ्यावी तसेच अन्य तालुक्यातून उत्सवासाठी कोणालाही बोलावू नये असे आदेश दिले आहेत. आदेशाचा भंग झाल्यास आयोजक व मानकरी यांच्यावर कडक कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


संगमेश्‍वरचा शिंपणे उत्सव अखंड महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. हा उत्सव संगमेश्‍वर, कसबा आणि फणसवणे अशा तीन ठिकाणी साजरा होतो. संपूर्ण राज्याची रंगपंचमी, धुळवड झाली की येणार्‍या फाल्गुन अमावास्येआधी बलिदानाचा दिवस पाहून हा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील हजारो भाविक न चुकता दरवर्षी संगमेश्‍वरात हजेरी लावतात. सकाळी सुरू होणारा हा उत्सव मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो. ओलेकाजुगरयुक्त मटण आणि भाकरीचा प्रसाद भाविकांना दिला जातो. शिवाय घराघरातही त्यादिवशी पाहुण्यांची मोठी वर्दळ असते. 

यावर्षी पाडवा बुधवारी आल्याने शिंपणे रविवारी 22 मार्चला साजरे होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. आता पोलिसांनी या उत्सवाला नोटीस बजावल्याने मानकरी आणि आयोजक कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com