किनारपट्टीवर चिंता आणखी तीव्र 

प्रशांत हिंदळेकर
शनिवार, 30 मे 2020

व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मासळी हातगाडीने त्यांच्या कावनापर्यंत पोचवितो. मात्र या वर्षीचा मत्स्यहंगाम पाहता वाहतुकीचे भाडे मिळण्याचे प्रमाण 70 टक्‍क्‍यांनी घटले आहे.

मालवण (सिंधुदुर्ग) - मत्स्यदुष्काळाच्या झळा यंदा जास्त तीव्र आहेत. क्‍यार वादळ आणि त्यापाठोपाठ कोरोनामुळे आलेली मंदी याचा मासेमारीला तगडा फटका बसला आहे. यामुळे या धंद्यात किती भविष्य आहे याची चिंता पूर्ण किनारपट्टीला सतावते आहे. सिंधुदुर्गातील किनारी भागाचे अर्थकारण येत्या काळात खूपच चिंताजनक होईल अशा भावना या क्षेत्रातील अनेकांनी `सकाळ`कडे मांडल्या. यातील काही प्रतिक्रिया...

22 हून अधिक वर्षे हातगाडीवरून मासळीची वाहतूक करत आहे. मालवण बंदरात सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात मासळी खरेदी, विक्री चालते. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मासळी हातगाडीने त्यांच्या कावनापर्यंत पोचवितो. मात्र या वर्षीचा मत्स्यहंगाम पाहता वाहतुकीचे भाडे मिळण्याचे प्रमाण 70 टक्‍क्‍यांनी घटले आहे. परराज्यातील मच्छीमारांकडून अवैधरित्या होणाऱ्या मासेमारीचा परिणाम मासेमारीवर झाला. पारंपरिक मच्छीमारांना समाधानकारक मासळी मिळाली तरच भवितव्य आहे. 
- श्रीकृष्ण मणचेकर, हातगाडी व्यावसायिक वायरी. 

वयाच्या 20 वर्षांपासून मासळी विक्रीचे काम करत आहे. हा व्यवसाय माझा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. माझ्या मुलांची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. आता पूर्वीसारखी मासळी विक्रीसाठी मिळत नाही. परराज्यातील ट्रॉलर्स घुसखोरी करून मासळी लूटून नेत असल्याने आमच्या हाती काही लागत नाही. हीच परिस्थिती राहिल्यास जगायचं कसे आणि मुलांना जगवायचे कसे हा प्रश्‍न मला पडला आहे. 
- संगीता कोचरेकर, एकल महिला मच्छीमार विक्रेत्या, देवगड 

पीटर आईस ऍण्ड कोल्ड स्टोअरेज ही सर्वात जुना व लहान बर्फ कारखाना आहे. मासळी मिळत नसल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत बर्फाची मागणी 50 ते 60 टक्के कमी आहे. वर्षातून दोनदा वाढणारे वीज बील, जीएसटी, व्यवसाय कर वेल्ववर भरून वारंवार येणारी नोटीस, यामुळे धंदा नको नोकरी बरी, अशी म्हणण्याची वेळ आहे. मासळी मिळत नसल्याने बर्फाला मागणी नाही. मासळी मिळाली की सणासारखे वातावरण असते. बाजारातील प्रत्येक दुकानावर मत्स्यदुष्काळाचा परिणाम आहे. 
- जर्विन डिसोझा, बर्फ व्यावसायिक 

मत्स्यदुष्काळाचा परिणाम जाळ्यांच्या विक्रीवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. सन 2008 पासून हा परिणाम जाणवतो आहे. शिवाय चक्रीवादळे, समुद्री वातावरणातील बदल आणि आता कोरोनाच्या संकटात मासेमारी व्यवसाय ठप्प आहे. गेल्या काही वर्षातील मत्स्य हंगामातील परिस्थिती लक्षात घेता मासेमारी जाळ्यांच्या विक्री 60 टक्क्‌यांहून अधिक घटली आहे. मत्स्यदुष्काळासह अन्य संकटामुळे व्यवसायाचे भवितव्यही धोक्‍यात आले आहे. सद्यःस्थिती या व्यवसायात उभारी घेण्याचे मोठे आव्हान आहे. 
- दादा कांदळगावकर, जाळी, स्पेअरपार्ट व्यावसायिक, मालवण. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact fishers konkan sindhudurg