esakal | कोरोनामुळे फळांचे मार्केट बिघडले 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus impact fruit market sawantwadi konkan sindhudurg

बाजारामध्ये विशेष करून बेळगाव येथून सकाळी मोठ्या प्रमाणात विक्रेते फळे घेऊन विक्री करतात. बेळगाव येथे इतर देशातून तसेच इतर राज्यातून आलेला हा माल पुढे विविध मुख्य बाजारपेठांमध्ये पाठविण्यात येतो. 

कोरोनामुळे फळांचे मार्केट बिघडले 

sakal_logo
By
भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरून बाजारपेठेत आलेल्या विविध फळांना मोठी मागणी असते; मात्र यंदा कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने फळांना ग्राहक मिळणे कठिण बनले आहे. कोरोनाबरोबरच फळांचे तिप्पट-चौपट वाढलेले दरही त्यामागचे प्रमुख समजले जात आहे. 
नागरिक उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी करतात; मात्र यंदा कोरोनामुळे सर्वांचेच आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले. त्यात फळांचे दर तिप्पट-चौपट झाल्याने फळांची खरेदी रोडावली आहे. बाजारामध्ये विशेष करून बेळगाव येथून सकाळी मोठ्या प्रमाणात विक्रेते फळे घेऊन विक्री करतात. बेळगाव येथे इतर देशातून तसेच इतर राज्यातून आलेला हा माल पुढे विविध मुख्य बाजारपेठांमध्ये पाठविण्यात येतो. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अलीकडे सावरत असलेला व्यापारी विक्रेता वाहतूक खर्च तेवढा परवडत नसतानाही बेळगावपासून जवळ असलेल्या सिंधुदुर्गातील तालुक्‍यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आपला माल विक्रीस आणतो. यात भाजीसह सफरचंद, मोसंबी, संत्री, डाळींब, द्राक्षे, पेरू अशी फळे उपलब्ध होतात. उन्हाळ्याच्या दिवसात बरेचसे नागरिक फळांचा ज्यूस मोठ्या प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे फळांची विक्री जोरात असते; मात्र याच दिवसात कमी उत्पादनामुळे फळांचे वाढलेले दर पाहता नागरिकांचे तोंडचे पाणीच पळाले आहे.

बाजारात 60 ते 80 रूपये किलो दराने मिळणारी सफरचंद सध्या 200 ते 220 रुपयापर्यंत पोचली आहेत. फळांचे वाढलेले दर पाहता नागरिकांनी फळ खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सण-उत्सव असताना फळांना मागणी असते आणि त्याच दिवशी आम्हाला चांगला ग्राहक मिळतो, अशी प्रतिक्रिया बेळगाव येथील व्यापारी देत आहेत. सध्या मात्र परवडत नसतानाही फळविक्री करावी लागत आहे. 

कोरोना रुग्णवाढीचा परिणाम 
सर्व खर्चाचा विचार करता बाजारपेठेत आम्हाला दर ठरवावे लागतात; मात्र अशा परिस्थितीत ग्राहक उपलब्ध नसल्याने चिंता निर्माण होते. त्यातच याआधी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना वाहतूक बंद असल्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागला होता. आता पुन्हा कोरोना रूग्णात वाढ होत असल्याने बाजारपेठेवर परिणाम होणार असल्याचे फळ विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. 

विक्रेते चिंतेत 
सफरचंद याआधी चीनमधूनही आयात होते; मात्र कोरोनामुळे चीनमधील सफरचंदाला देशात फारशी मागणी नाही. ही मागणी घटल्यामुळे इराण, ऑस्ट्रेलिया व इतर काही देशातील सफरचंदासह इतर फळे भारतात आयात होत आहेत. बेळगाव येथे माल आल्यानंतर ही फळे सिंधुदुर्गात दाखल होतात; मात्र सध्या पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने फळे खरेदीकडे नागरिक पाठ फिरवत आहेत. यामुळे विक्रेते मोठ्या चिंतेत सापडले आहेत. 

असे वाढले दर 
*फळे*आताचा*पूर्वीचा 
*सफरचंद*200 ते 220*60 ते 80 
*संत्री*160 ते 170*60 ते 70 
*डाळींब*160*100 
*मोसंबी*100 ते 120*60 ते 70 

कोरोना आणि फळांचे दर वाढल्याने नागरिक फळ खरेदी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. किरकोळ ग्राहक फळे खरेदीसाठी येत आहेत. 
- नियाज हलदी, फळ विक्रेते 

संपादन - राहुल पाटील

loading image