गणेशोत्सव चार दिवसांवर तरी `या` तालुक्यात `कही खुशी कही गम`

तुषार सावंत
Wednesday, 19 August 2020

श्रावणात अतिवृष्टीमुळे नागरिक घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळेही आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला. आता तर गणेश उत्सवाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काही दिवसाचा कालावधी आहे. तरीही बाजारपेठांमध्ये म्हणावी तशी मोठी उलाढाल दिसून येत नाही. त्यामुळे गेल्या साडेचार महिन्यात आर्थिक मंदीला तोंड देणाऱ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह संसर्ग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. "कही खुशी कही गम' अशी परिस्थिती ओढवली आहे. 

यापूर्वी परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना लागण होत होती; पण गेल्या महिन्या दोन महिन्यांमध्ये स्थानिक नागरिक आजाराने संसर्गजन्य होऊ लागल्या आहेत. प्रशासनाने अनेक नियम आणि अटी लागू केल्या; पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू झाले. मुळात ग्राहकांच्या हातातच पैसा नसल्यामुळे स्थानिक बाजारपेठांवर आर्थिक उलाढालीचा परिणाम दिसून आला आहे. श्रावणात अतिवृष्टीमुळे नागरिक घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळेही आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला. आता तर गणेश उत्सवाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. 

गणेश उत्सव साजरा करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असले तरी ग्राहक बाजारपेठेत तसा पोहचू शकलेला नाही. किंबहुना मुंबईहून येणारे चाकरमानी टप्प्याटप्प्याने गावाकडे आल्यामुळे एकाच वेळी होणारी खरेदी तशी थांबलेली आहे. बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत नाही. दरवर्षी गणेशोत्सवाच्यापूर्वी चार दिवस मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे येत असतात. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल जिल्ह्यामध्ये होते.

यंदा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असून सार्वजनिक कार्यक्रम जवळपास बंद झालेले आहेत. प्रत्येकाच्या घरात - वाडीत वस्तीवर होणाऱ्या सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम होणार नसल्याने खरेदीही होणार नाही. तसेच मोठा सार्वजनिक कार्यक्रमही नियोजित नसल्याने प्रवासाचे योगही येणार नाहीत. परिणामी जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीबरोबरच खाजगी भाडे तत्वावर चालणाऱ्या प्रवासी वाहनातील तीन आसनी, सहा आसनी रिक्षा किंवा वडाप वाहतूक यांच्याही व्यवसायावर तीव्र परिणाम होणार आहे. 

रेल्वे गाड्यांना अल्प प्रतिसाद 
कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या 15 ऑगस्टपासून सुरू झाल्या आहेत; मात्र गेल्या दोन दिवसात रेल्वेने हजारभर प्रवाशी आले नाहीत. सोमवारी (ता. 17) तर कणकवली रेल्वे स्थानकात एका विशेष गाडीतून तीनच प्रवाशी उतरले. दिवसभरातील तीन गाड्यातून कणकवली स्थानकात 25 प्रवाशी मुंबईतून आले होते. त्यामुळे रेल्वे गाड्याची घोषणा उशिराने झाल्याने प्रवाशी वर्गातील नाराजी स्पष्ट झाली आहे. 
 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact ganeshotsav konkan sindhudurg