शिवसैनिकांनो, काॅरंटाईन व्हा! असे का म्हणाले कणकवलीचे नगराध्यक्ष?

राजेश सरकारे
Wednesday, 22 July 2020

कणकवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना पॉझिटिव्ह ठरलेले आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्र्यांसमवेत दोन दिवसांत ठिकठिकाणी दौरे केले आहेत. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी नाईक यांच्या सोबत असलेले सतीश सावंत, संदेश पारकर यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी क्‍वारंटाईन व्हावे, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. तसेच शासनाकडे 5 हजार रॅपिड टेस्ट किटची मागणी केल्याचेही ते म्हणाले. 

नलावडे म्हणाले, नाईक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नाईक यांचे संपूर्ण घर सॅनिटाईज केले आहे. नगरसेवक सुशांत नाईक यांचे घर आणि परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. कणकवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा. 

वाचा - त्या बैठकीला उपस्थित होते नाईक  : पालकमंत्री उदय सामंतसह वरिष्ठ  अधिकारी यांच्यावर क्वारंटाइनची टांगती तलवार..... 

पालकमंत्री उदय सामंत यांनी नरडवे धरण, बसस्थानक, भालचंद्र आश्रम संस्थान, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान आदींसह विविध ठिकाणी भेटी-गाठी दिल्या आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी होते. त्या सर्वांनी स्वतःची, आपल्या कुुंटुंबियांची तसेच कणकवलीकरांची काळजी घेण्यासाठी 14 दिवस घरी क्‍वारंटाईन व्हावे.

नगराध्यक्ष म्हणाले, महिन्यापूर्वी शिवसेनेचे काही नेते, पदाधिकाऱ्यांनी क्‍वारंटाईन न होणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, अशा मागणीचे निवेदन दिले होते; परंतु आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही. कुठल्याही शिवसेनेच्या नेत्या, पदाधिकाऱ्याविरोधात तक्रार करणार नाही. कारण कोरोना हा अतिसंसर्गजन्य असल्याने तो कुणालाही होऊ शकतो. 

तत्काळ किटची गरज 
कोरोनामध्ये राजकारण आणणार नाही; मात्र कणकवलीवासीयांच्या सुरक्षेसाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी क्‍वारंटाईन व्हावे. कणकवलीत समुह संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे शहरासाठी 5 हजार रॅपिड टेस्ट किट दिल्या जाव्यात, अशी मागणी शासनाकडे केली आहे. त्या किट तत्काळ उपलब्ध झाल्या तर तापसरीच्या रुग्णांची तपासणी करणे आणि कोरोनाला आळा घालणे शक्‍य होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact kankavli konkan sindhudurg