हुश्श...कणकवली "अंडर कंट्रोल' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कणकवलीवासीयांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती; मात्र दोन दिवसांत शहर आणि परिसरातील बाधितांच्या संपर्कातील बहुतांश जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, तर कुटुंबातीलच किंवा अति निकटच्या व्यक्‍तींचेच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

कणकवली (सिंधुदुर्ग) - रेड झोनच्या वाटेवर असलेल्या कणकवली शहर आणि परिसरात सध्या कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याची स्थिती आहे. बाधितांच्या कुटुंबातील सदस्य, तसेच अति निकटच्याच व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर उर्वरित संपर्कातील व्यक्‍तींचे अहवाल निगेटिव्ह आलेत. आरोग्य विभागानेदेखील तातडीने पावले उचलत बाधितांच्या संपर्कातील व्यक्‍तींचे तातडीने विलगीकरण केले आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण कणकवली तालुक्‍यात आढळला होता. त्यानंतरही बाधितांची संख्येत तालुका अग्रेसर राहिला आहे; मात्र संस्थात्मक आणि होम क्‍वारंटाईनची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाल्याने तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव मर्यादित राहिला होता. आठ-दहा दिवसांत शहरालगतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समूह संसर्ग सुरू झाला. त्यानंतर हा संसर्ग त्यांचे कुटुंबीय आणि अति निकटच्या व्यक्‍तींमध्येही झाल्याने कणकवलीवासीयांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती; मात्र दोन दिवसांत शहर आणि परिसरातील बाधितांच्या संपर्कातील बहुतांश जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, तर कुटुंबातीलच किंवा अति निकटच्या व्यक्‍तींचेच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

शहरात सध्या अंशतः बाजारपेठ, वरचीवाडी, साईनगर येथील भाग कंटेन्मेंट झोन आहे, तर लगतच्या दोन किलोमीटर परिसरातील जानवली आणि कलमठ गावातील काही वाड्या कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत, तर तालुक्‍यात आतापर्यंत एकूण 82 जण बाधित ठरले आहेत. दरम्यान, समूह संसर्गानंतर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत बाधितांच्या अति निकटच्या व्यक्‍तींचे विलगीकरण केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा समूह संसर्ग टाळण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. 

व्यावसायिकांकडून दक्षता 
कणकवलीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अर्धी बाजारपेठ पूर्णतः सील करण्यात आली, तर उर्वरित बाजारपेठेतील व्यावसायिकांकडून ग्राहकांशी खरेदी-विक्री करताना कमालीची दक्षता बाळगली जात आहे, तर कोरोनाच्या धसक्‍याने कणकवली बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळही मंदावली आहे. 

शहरात आढळलेल्या बाधितांची घरे आणि तेथील परिसर नगरपंचायतीने निर्जंतुकीकरण केला आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व खोल्या आणि परिसरदेखील निर्जंतुकीकरण केला आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची नोंद प्रभागनिहाय घेतली जात आहे. तसेच त्यांच्या विलगीकरणाचीही जबाबदारी नगरपंचायतीने घेतली आहे. 
- समीर नलावडे, नगराध्यक्ष कणकवली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact kankvli sindhudurg district