सिंधुदुर्गातील शेकडो तरुण अडचणीत..पण का?

रुपेश हिराप
रविवार, 24 मे 2020

कर्जाचे हप्ते, गाडीचे हप्ते, कुटुंब खर्च, आजारपणाचा खर्च यातून मार्ग कसा काढायचा, हा प्रश्‍न त्यांच्या मनात घोंगावत आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गोवा सरकार घ्यायला तयार आहे; पण तेथील घरमालक घ्यायला तयार नाहीत. शिवाय काही दिवस पेड क्वारंटाईन होण्याचा खर्चही परवडणारा नाही. काही कंपन्यांनी कामावरच येऊ नका, असे सांगितले आहे. त्यामुळे गोव्यात नोकरी करणारे सिंधुदुर्गातील शेकडो तरुण अडचणीत आहेत. यात बहुसंख्य रहिवासी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्‍यातील आहेत. 

कोरोनाच्या संकटाने अनेकांना जमिनीवर आणले. लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्यामुळे रोजंदारीवर गुजराण करणाऱ्या अनेकांसमोर विविध समस्या "आ' वासून उभ्या आहेत. यातच सिंधुदुर्गातून नोकरीनिमित्त गोव्यात जाणाऱ्या तरुणांना गेले दोन महिने पगार नसल्याने आज उपासमारीची वेळ आली आहे. कर्जाचे हप्ते, गाडीचे हप्ते, कुटुंब खर्च, आजारपणाचा खर्च यातून मार्ग कसा काढायचा, हा प्रश्‍न त्यांच्या मनात घोंगावत आहे. 

यातच आता असलेली नोकरी सुटण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्‍यावर आहे. 
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तीन तालुक्‍यांचा विचार करता दहा हजारांच्या आसपास तरुण नजीकच्या गोवा राज्यावर अवलंबून आहेत. यामध्ये तरुणींची संख्याही लक्षणीय आहे. एकट्या दोडामार्ग तालुक्‍याचा विचार करता पाच हजारांच्या वर तरुण-तरुणी गोव्यात कामाला आहेत. यातील बहुसंख्य गोव्यातून दररोज ये-जा करतात. कोरोनामुळे गोव्याची सीमा सील आहे. आज हे सर्व जण घरीच बसून असून गेले दोन महिने ना काम ना पगार, अशा परिस्थितीतून ते जात आहेत. नोकरीवरच अनेकांचे संसार चालत असल्याने दोन महिने हातात पैसा नसल्याने अनेकांसमोर संकटे उभी राहिली आहेत. 

गोव्यातील बऱ्याच कंपन्यांमध्ये जिल्ह्यातील तरुण दहा ते पंधरा वर्षे मोठ्या हुद्द्यावर आहेत. यात मशिन ऑपरेटर व लाईन ऑपरेटरही आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे बरीच यंत्रे आजही सुरू झालेली नाहीत. अशांना एकीकडे कंपनीकडून कामावर बोलावले जात आहे; मात्र लॉकडाउन व गोवा राज्यातील नियमावली आड येत असल्याने कामावर जाताही येत नाही. जिल्ह्यातील अशा कामगारांना गोव्यात नेण्यासाठी गोवा उद्योग संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाला गोवा सरकारने अटी, शर्तींच्या आधारावर परवानगी दिली होती; मात्र प्रत्यक्षात यासंदर्भात काहीच हालचाली झाल्या नसल्याने काही प्रमाणात आशा पल्लवीत झालेल्या जिल्ह्यातील युवकांच्या पदरात निराशाच आली. 

गोवा सरकारच्या नियमावलीनुसार, एकदा गोव्यात गेल्यानंतर पुन्हा त्यांना घरी येता येणार नाही. शिवाय गोव्यात गेल्यावर त्यांची कोविड चाचणी करण्याबरोबरच काही दिवस त्यांना पेड क्वारंटाईन राहावे लागणार आहे. गोवा सरकारच्या सूचनेनुसार काही कंपन्यांकडून जिल्ह्यातील तरुणांना कंपनीकडून बोलावण्यात आले; मात्र क्वारंटाईनसाठी येणारा खर्च खिशाला परवडणारा नसल्याने कोणीच जाण्याचे धाडस करत नाही. काही कंपन्यांकडून हा खर्च उचलण्याचे सांगितले; पण नंतर गोव्यात राहायची सोय नाही. काही जणांची भाड्याची रूम आहे; पण घरमालक त्यांना घ्यायला तयार नाही. 

पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे वर्षभर पुरेल इतकी शेती करणेही गरजेचे आहे. शिवाय दोन महिन्यांवर गणेश चतुर्थी सण आहे. या सर्वांचा विचार करता आम्हाला गोवा सरकारने दररोज ये-जा करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी तरुणांमधून होत आहे. यातच बऱ्याच अकुशल स्वरूपाचे काम करणाऱ्यांनी नोकरी गमावली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेकडो तरुणांसमोर "जगावे की मरावे?' असा सवाल निर्माण झाला आहे. 

तर कामावरच येऊ नका... 
जिल्ह्यात अडकलेल्या काही तरुणांना गोव्यात कामावर जाता येत नसल्याने काही कंपन्यांच्या मालकांनी तुम्ही आता कामावरच येऊ नका, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे दोन महिन्यांचा पगार नाही आणि आता कामही राहिले नसल्याने कर्जाचे हप्ते, घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 

गोव्यात गेल्यास पे क्वारंटाईनचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे दोन्ही राज्यांनी यासाठी तोडगा काढावा. शिवाय गोवा व सिंधुदुर्ग यांचे नाते लक्षात घेता नोकरदारवर्गाला दररोज ये-जा करण्यासाठी मुभा द्यावी. आजही आम्हाला गोव्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास अशी वेळ येणार नाही, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत. 
- बंटी सावंत, माजगाव (ता. सावंतवाडी) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact konkan sindhudurg