esakal | कोरोना रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus impact konkan sindhudurg

जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, दिवसाला किमान 300 चाचण्यांचे उद्दिष्ट दिले आहे. 

कोरोना रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोरोना प्रतिबंधासाठी निर्बंध कडक केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने ऍक्‍शन सुरू केली आहे. पालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरू केली. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात नियमभंग करणाऱ्यांवर यंत्रणेची करडी नजर आहे. जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, दिवसाला किमान 300 चाचण्यांचे उद्दिष्ट दिले आहे. 

रुग्ण वाढू नयेत, यासाठी जिल्ह्यात चारसूत्री कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.22) जाहीर केला होता. चाचण्या वाढविणे, मृत्यूदर कमी करणे, विनामास्क फिरणाऱ्यांना दंड व कार्यक्रमांवर करडी नजर आदींचा त्यात समावेश आहे. अँटिजेन न करता आरटीपीसीआर चाचणीच्या सूचना आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी सर्व यंत्रणांना ऍक्‍टिव्ह मोडमध्ये येण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार यंत्रणा आजपासून कार्यरत झाली. पोलिस प्रशासनानेसुद्धा विशेषतः विनामास्क फिरणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पालिका प्रशासन सक्रिय आहे. शहरात फिरणाऱ्या व्यक्तीकडे मास्क नसल्यास दंड वसूल केला जात आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 397 व्यक्तींवर अशी दंडात्मक कारवाई झाली. 

महसूल विभागाने काल एका दिवसात 41 व्यक्तींवर कारवाई करत एकूण आठ हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांनी 176 व्यक्तींवर कारवाई करत 35 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. पालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक 180 व्यक्ती विनामास्क आढळल्या. त्यांच्याकडून 36 हजार रुपये दंड वसूल केला आहे. काल दिवसभरात वसूल दंडाची रक्कम 79 हजार 400 रुपये आहे. 

चार रेस्टॉरंटकडून नियमभंग 
जिल्ह्यातील महसूल, पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून एकूण 126 ठिकाणांची तपासणी झाली, तेव्हा 14 ठिकाणी कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये चार रेस्टॉरंटचाही समावेश आहे. कोरोना प्रभाव वाढू नये, यासाठी शासकीय यंत्रणा प्रभावीपणे राबत आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

 संपादन - राहुल पाटील