....अखेर चितारआळीतील व्यापाऱ्यांना दिलासा

रुपेश हिराप
Monday, 3 August 2020

मागणीची दखल घेऊन तत्काळ हा कंटेन्मेंट झोन कमी केला आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील चितारआळी परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जाहीर केलेला कंटेन्मेंट झोन आता कमी करून फक्त बाधितांच्या घरापासून 100 मीटर परिसरातच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या व्यावसायिकांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी नगरसेवक तथा शहर हितवर्धक समितीचे अध्यक्ष सुरेश भोगटे यांच्या पाठपुराव्याला यश आले. 

चितारआळी 100 मीटरच्या पुढे कंटेन्मेंट झोनवर बॅरिकेट्‌स लावण्यात आले होते. त्यामुळे या परिसरातील अनेक व्यापाऱ्यांना या झोनच्या बाहेर जाता - येत नव्हते. याचा परिणाम व्यापारावर झाला होता. गणेशचतुर्थी व इतर सणांच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित परिसरातील कंटेन्मेंट झोन कमी करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी काल प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे केली होती.

त्या मागणीची दखल घेऊन तत्काळ हा कंटेन्मेंट झोन कमी केला आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल नागरिक व्यापाऱ्यांसह श्री. भोगटे यांनी आभार मानले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sawantwadi sindhudurg district