दोडामार्गात चाकरमान्यांबाबत खबरदारी, आयटीआयचे केले...

प्रभाकर धुरी
Tuesday, 21 July 2020

हॉटस्पॉट किंवा कंटेन्मेंट झोनमधून आलेल्या व्यक्ती, कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्ती आणि गरोदर महिला आदी प्रकारच्या व्यक्तींचे स्वॅब याठिकाणी गोळा केले जाणार आहेत. 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवासाठी तालुक्‍यात येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन येथील आयटीआयमध्ये कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यासंदर्भातील सगळी तयारी पूर्ण झाली असून त्या सेंटरमध्ये आजपासून स्वॅब गोळा करण्यात येणार आहेत. स्वॅब गोळा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. आठ प्रकारच्या व्यक्तींचे स्वॅब तिथे घेतले जाणार आहेत. गोळा केलेले स्वॅब दररोज दुपारी जिल्हा रुग्णालयात तपासणीस पाठविले जाणार आहेत. तपासणी अहवाल तीन दिवसांत मिळणार आहे. अहवाल येईपर्यंत त्या व्यक्तीला त्याच सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे. 

कोविड सेंटरची क्षमता 50 बेडची आहे. सद्यस्थितीत 40 बेड उपलब्ध आहेत. रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची सोयही आहे. परदेश प्रवासाहून आलेली व्यक्ती, कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती, श्‍वसनाच्या तीव्र आजारामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्ती, कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील अतिजोखमीच्या कुटुंबातील व्यक्ती, हॉटस्पॉट किंवा कंटेन्मेंट झोनमधून आलेल्या व्यक्ती, कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्ती आणि गरोदर महिला आदी प्रकारच्या व्यक्तींचे स्वॅब याठिकाणी गोळा केले जाणार आहेत. 

गोव्यात जाणाऱ्याची तपासणी करा 
तालुक्‍यातील अनेक तरुण कामानिमित गोव्यात जातात. त्यांना स्वॅब तपासणीसाठी गोवा सीमेवर दोन हजार रुपये भरावे लागतात. त्या तरुणांची स्वॅब तपासणी शासनाने दोडामार्गमधील कोविड सेंटरमध्ये मोफत करुन अहवाल द्यावा, जेणेकरून त्यांचा गोव्यात जाण्याचा मार्ग सुकर होईल. त्याची कार्यवाही तत्काळ व्हावी, अशी मागणी युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली आहे. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sindhudurg district