esakal | धक्क्यावर धक्के...कारिवडेतील ग्रामस्थांचे धाबे दणाणले
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus impact sindhudurg district

कारिवडेमध्ये यापूर्वीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत; मात्र ते सर्व रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन असल्याने ते अन्य कोणाच्या संपर्कात आले नव्हते.

धक्क्यावर धक्के...कारिवडेतील ग्रामस्थांचे धाबे दणाणले

sakal_logo
By
भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कारिवडेत अजून तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये दोन लहान मुले व एका महिलेचा समावेश असून दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातीलच ते जवळचे नातेवाईक आहेत. तालुक्‍याची एकुण रुग्णसंख्या आता 64 वर पोहचली, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी सांगितले. 

कारिवडेमध्ये दोन दिवसांपूर्वी स्थानिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. आरोग्य प्रशासनाने तत्काळ पावले उचलताना तो भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करताना संबंधित व्यक्तीच्या घरातील व शेजारील असे मिळून एकूण बारा व्यक्तींचे स्बॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन केले होते. त्यापैकी आज त्याच्या जवळचे नातेवाईक असणाऱ्यापैकी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कारिवडेमध्ये यापूर्वीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत; मात्र ते सर्व रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन असल्याने ते अन्य कोणाच्या संपर्कात आले नव्हते.

दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या तो पॉझिटिव्ह रुग्ण चितारआळी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला असावा, असा संशय आहे. चितारआळी भागात नोकरीनिमित्त जाणे येणे होते. कारिवडे गावात एकापाठोपाठ एक रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांमधून काहीशी भीती व्यक्त होत आहे. 

सावंतवाडी शहरातील चितारआळी येथील दाम्पत्याच्या संपर्कातील सात व्यक्तींचा अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आला असून सुरुवातीला निगेटिव्ह आलेल्या त्याच्या मुलाचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. मळगाव येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील काही जणांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही; मात्र तालुक्‍यात जे स्थानिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत त्यांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यांना क्वारटांईन करण्यात आले आहे; मात्र संपर्कातील व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने भीती व्यक्त होत आहे. नव्याने तीन रुग्ण आढळून आल्याने कारिवडे ग्रामपंचायत प्रशासन व सनियंत्रण समिती अधिक सतर्क झाली आहे. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top