कोरोनाग्रस्तांचा उच्चांक, सिंधुदुर्गाची वाटचाल धोक्‍याकडे 

विनोद दळवी 
Saturday, 19 September 2020

कोरोनाने महिन्याच्या पहिल्या 17 दिवसांत तब्बल 34 बळी घेतले, तर 1 हजार 589 एवढे नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - सुरुवातीचे 5 महिने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कासव गतीने संक्रमण करणाऱ्या कोरोनाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठी आघाडी घेतली. सप्टेंबरमध्ये तर जिल्ह्यात कोरोनाची धोकादायक वाटचाल सुरू आहे. कोरोनाने महिन्याच्या पहिल्या 17 दिवसांत तब्बल 34 बळी घेतले, तर 1 हजार 589 एवढे नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. 

वाढलेले आकडे असे 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 सप्टेंबरपर्यंत कोरोना तपासणीसाठी 21 हजार 523 नमुने घेण्यात आले आहेत. यांतील 20 हजार 882 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालात 2 हजार 886 नमुने बाधित आले आहेत, तर 17 हजार 996 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 1 हजार 536 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 54 व्यक्तींचे निधन झाले आहे. परिणामी सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 296 आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 26 मार्चला सापडला होता. त्यानंतर ही रुग्ण संख्या 25 ऑगस्टला 1 हजार झाली. म्हणजेच तब्बल 153 दिवसांनी जिल्ह्याच्या रुग्ण संख्येने हजारी गाठली; मात्र त्यानंतर 9 सप्टेंबरला संख्या दुप्पट म्हणजे दोन हजार झाली. अवघ्या 15 दिवसांत आणखी एक हजार रुग्ण वाढले. 

चिंता वाढली 
26 मार्चला जिल्ह्यात पहिला रुग्ण मिळाल्याने 16 सप्टेंबरपर्यंत कोरोनाच्या जिल्ह्यातील मुक्कामाला 175 दिवस पूर्ण झाले. यातील 31 ऑगस्ट या 159 दिवसांत जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित संख्या 1 हजार 287 होती. कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 13 हजार 557 होती. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 668 होती, तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 20 होती. सक्रिय रुग्ण 599 होते. त्यानंतर 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या 16 दिवसांत मात्र हे सर्वच आकडे शीघ्र गतीने वाढले आहेत. नमुने संख्या, बाधित संख्या, मृत्यू, डिस्चार्ज व सक्रिय रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ चिंता वाढविणारी आहे. 

मृत्यू दरही दुप्पट (सप्टेंबरचे पहिले 16 दिवस) 
- नव्याने चाचणीसाठी नमुने 7582 
- आढळलेले रुग्ण 1423 
- डिस्चार्ज मिळालेले रुग्ण 863 
- सक्रिय रुग्ण 1129 
- 153 दिवसांत रुग्ण 1000 
- पुढील 18 दिवसांत संख्या 2000 
- दगावलेले रुग्ण 30 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sindhudurg district