...अन्‌ मजुरांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

एवढेच नव्हे तर या कुटुंबांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बस उपलब्ध करणे आणि त्यासाठीचाही खर्च या सर्वांकडून करण्यात आला. 

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या बारामती येथील चार कुटुंबातील 25 सदस्यांना खासगी बसमधून रवाना करण्यात आले. या कालावधीत या मजूरांच्या राहण्या-जेवणाचा खर्च खारेपाटण ग्रामसनियंत्रण समिती, पोलिस, महसूल विभाग, खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी केला होता. एवढेच नव्हे तर या कुटुंबांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बस उपलब्ध करणे आणि त्यासाठीचाही खर्च या सर्वांकडून करण्यात आला. 

विळा, कोयता, पहार आदी अवजारे आदींचा व्यवसाय करण्यासाठी बारामती मधील भटक्‍या कुटुंबातील 25 सदस्य तीन महिन्यापूर्वी सिंधदुर्गात आली होती. लॉकडाऊन मुळे ही सर्व मंडळी खारेपाटण येथेच अडकून पडली होती. त्यांना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा खारेपाटण ग्रामसनियंत्रण समिती आणि महसूल विभागाने केला. तर खारेपाटण आरोग्य केंद्राच्या माध्यमातून भटक्‍या कुटुंबातील या मजूरांची तपासणी केली जात होती. खारेपाटण रामेश्वर नगर येथील ग्रामपंचायत मालकीच्या निवारा केंद्रात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

बारामती मधील या सर्वांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक श्री.बांगर यांनी खासगी बस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. तर सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी या सर्वांची ऑनलाइन नोंदणी केली. खारेपाटण मंडळ अधिकारी मंगेश यादव तसेच येथील ग्रामस्थांनी बस भाड्याचा आर्थिक भार उचलला. तर गावी जाताना या सर्वांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था शिवा मेस्त्री यांनी केली. 

प्रशासनाची उपस्थिती 
खारेपाटण येथून खासगी बसमधून भटक्‍या कुटुंबांची रवानगी करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.बांगर, सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक, रूपेश सावंत, खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर कुबल, राजू वरूणकर, सरपंच रमाकांत राऊत, पोलिस हवालदार अनमोल रावराणे, पोलिस नाईक, उद्धव साबळे, सुयोग पोकळे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact workers sindhudurg district